विकासाची जबाबदारी डॉ. माशेलकरांवर; संशोधकांची रिक्त पदे भरण्याचे आव्हान

परळ येथील जगप्रसिद्ध हाफकिन संशोधन संस्थेला निधीअभावी पुरती अवकळा आली असून या संस्थेला पूर्वीचे वैभव प्राप्त करून देण्यासाठी ख्यातनाम संशोधक डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय पातळीवरील तज्ज्ञांची समिती नियुक्त करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे या संस्थेत संशोधनाला चालना मिळावी यासाठी संशोधन विद्यापीठ निर्मितीची योजनाही मांडण्यात आली आहे.

corruption in academic research
संशोधन कमी आणि बाजार जास्त!
course on quantum technology for the first time in the country
देशात पहिल्यांदाच क्वांटम तंत्रज्ञानावरचा अभ्यासक्रम… जाणून घ्या सविस्तर!
Savitribai Phule Pune University
‘ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट’मध्ये आता गुद्द्यांची नवी संस्कृती; विद्यार्थी, विद्यार्थी संघटनांतील हिंसक प्रकरणांमध्ये वाढ
oil companies latest marathi news
तेल कंपन्यांची हजारो डॉलरची बचत करणार ‘सिली’ उपकरण… काय आहे संशोधन?

गेल्या दोन दशकांमध्ये राज्य शासनाने हाफकिन संशोधन व चाचणी संस्थेकडे संपूर्ण दुर्लक्ष केल्यामुळे येथील संशोधन जवळपास ठप्प झाले आहे. संशोधनासाठी कोटय़वधी रुपयांची व संशोधकांची आवश्यकता असताना संशोधनासाठी राज्य शासनाकडून अवघे ९० लाख रुपये मंजूर करण्यात आले असून प्रत्यक्षात केवळ ७० लाख रुपये गेल्या वर्षी देण्यात आले. यातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे संशोधक व तंत्रज्ञांच्या मंजूर पदांपैकी सत्तर टक्के पदे रिक्त असल्यामुळे संशोधन करायचे कसे हा प्रश्न येथील व्यवस्थापनापुढे निर्माण झाला आहे. पदव्युत्तर तसेच पीएच.डी.च्या शिक्षणासाठी पाठय़वृत्तीही अत्यल्प मिळत असून तत्कालीन संचालक सीमा व्यास यांनी ही पाठय़वृत्तीही बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे या जगप्रसिद्ध संशोधन संस्थेमध्ये संशोधनासाठी पीएच.डी.चे विद्यार्थी मिळणे दुरापास्त झाले आहे. हाफकिनच्या विद्यमान हंगामी संचालिका निशिगंधा नाईक यांनी गेल्याच आठवडय़ात पदभार स्वीकारल्यापासून ग्रामीण भागात साप व विंचूदंशांवरील संशोधनाला तसेच कर्करोग, स्टेमसेल्सवरील संशोधनाला चालना देण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र त्यासाठी संशोधकांची रिक्त पदे भरण्याचे मोठे आव्हान त्यांच्यापुढे राहणार आहे.

आजघडीला हाफकिनमधील काही जागा टाटा कॅन्सर रुग्णालयाला देण्यात आली असून त्यापोटी टाटाकडून पाच कोटी रुपये येणे आहे. त्यापैकी टाटा कॅन्सर रुग्णालयाने एक कोटी रुपये दिले असून चार कोटी रुपये येणे बाकी आहे. याशिवाय राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाकडून वेतनाच्या प्रतिपूर्तीचे एक कोटी ७२ लाख रुपये येणे बाकी आहे. हाफकिनमधील जागेवर अनेक संस्थांचा डोळा असून यात आयसीएमआर नवी दिल्ली या संस्थेलाही येथे जेनेटिक रिसर्च सेंटर स्थापन करायचे आहे. त्याचप्रमाणे मुंबई महापालिकेलाही येथे रॅट डिस्ट्रक्शन आस्थापना स्थापन करायची आहे.

तज्ज्ञांची समिती

या पाश्र्वभूमीवर हाफकिनला पुन्हा जागतिक दर्जा प्राप्त करून देण्यासाठी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी पुढाकार घेतला असून संस्थेच्या विकासासाठी डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञांची समिती नेमण्यात आली आहे.  संस्थेतील सध्याच्या पायाभूत सुविधा व मानवी संशोधनाच्या स्थितीचा अभ्यास करणे, प्रस्तावित विद्यापीठ स्थापन करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधांचा आराखडा तयार करणे, संशोधक व शिक्षणतज्ज्ञांच्या माध्यमातून संशोधनात्माक विषयांचा अभ्यास करणे, सध्याच्या त्रुटी दूर करून अत्याधुनिक प्रयोगशाळांची स्थापना करणे आदी बाबी समितीच्या कार्यकक्षेत असणार आहेत. हाफकिनला आर्थिकदृष्टय़ा स्वत:च्या पायावर भक्कमपणे उभे करण्यासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संशोधन व वैद्यकीय कंपन्यांबरोबर सहकार्य करार करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वेही निश्चित करण्यात येणार आहेत.