02 March 2021

News Flash

कॅन्सरग्रस्तांचा देवमाणूस

देशाच्या कानाकोपऱ्यातून कॅन्सरवरच्या उपचारांसाठी मुंबईत टाटा कॅन्सर हॉस्पिटलला येणाऱ्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना या हॉस्पिटल परिसरात एक देवमाणूस भेटतो…

गरीब कॅन्सरपीडितांना तसंच त्यांच्या नातेवाईकांना दिलासा देणारा माणूस हरकचंद सावला.

आनंद राजेशिर्के – response.lokprabha@expressindia.com
विशेष
देशाच्या कानाकोपऱ्यातून कॅन्सरवरच्या उपचारांसाठी मुंबईत टाटा कॅन्सर हॉस्पिटलला येणाऱ्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना या हॉस्पिटल परिसरात एक देवमाणूस भेटतो…

एका कार्यक्रमात कॅन्सरग्रस्तांसाठी काम करणाऱ्या हरकचंद सावला यांची ओळख झाली होती.  कर्करुग्णांसाठी लाखो रुपये दरमहा गोळा करणाऱ्या आगळ्यावेगळ्या माणसाला नंतर भेटायचं ठरवलं. त्यासाठी मुंबईतल्या, परळच्या टाटा कॅन्सर हॉस्पिटलजवळ दुपारी १२ वाजता पोहोचलो. कच्छी गुजराती समाजातले, कुर्ता पायजम्यातच वावरणारे ५८ वर्षांचे हरकचंद सावला मंदिरात दानधर्म किंवा एखाद्या सामाजिक संस्थेला आर्थिक मदत करून आपले कर्तव्य संपले म्हणून ते संतुष्ट नाहीत. तर कॅन्सरसारख्या दुर्धर, घटका घटकाने जीवन संपणाऱ्या रुग्णांसाठी, त्यांच्या नातेवाईकांसाठी ते काम करत आहेत. काही वेळा संबंधित रुग्णाच्या मृत्यूनंतर त्याचा मृतदेह त्याच्या गांवी पोचविणे तर काही वेळा मुंबईतच सन्मानाने त्याच्यावर अंत्यसंस्कार करणे हेसुद्धा काम ते करतात!

टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे नाव ऐकल्यावरच सर्वसामान्य माणसाचे काळीज धडकते. मात्र या अवाढव्य हॉस्पिटल व परिसरात गेल्यानंतर हरकचंद सावला नेमके कोण हे कोणीही हमखास सांगते. गेली २५ पेक्षा जास्त वर्षे, एकही सुट्टी न घेता, स्वेच्छेने, विनावेतन गरीब रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांत दिवसभर मिसळणारे सावला हे कॅन्सर रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी देवमाणूसच आहेत.

रेल्वे डब्यासारख्या लांब पसरलेल्या दुकानांच्या रांगेत एका दुकानावर ‘जीवन ज्योत कॅन्सर रिलीफ व केअर ट्रस्ट’ अशी पाटी होती. काऊंटरच्या आत बसलेल्या निर्मलाताई (सावला यांची पत्नी), लांबट डेस्कवर अनेक कॉम्प्युटरसमोर बसलेल्या मुली, फाइल्सच्या रगाडय़ात खच्चून भरलेले रुग्णोपयोगी सामान यामधून जेमतेम चालता येत होतं. जागेच्या कमतरतेमुळे दुकानांच्या व्हरांडय़ातच दुपारच्या तयार जेवणाची भांडी, तपेली, केळी वा इतर फळे यांच्यासाठीचे डबे, हळद घातलेल्या गरम दुधाचे स्टीलचे भांडे, इ. वस्तू होत्या.

केमोथेरपीमुळे नाकात ऑक्सिजनची नळी अडकवलेले, अकाली डोक्यावरचे केस गेलेले, खंगलेल्या चेहऱ्यांचे कर्करुग्ण तसेच त्यांचे गरीब नातेवाईक दररोज बारा ते दीड आणि संध्याकाळी साडेसहा ते सात या वेळेत रांगा लावून भरपेट जेवतात. ६५० ते ७५० लोकांना हे जेवण मिळतं. मुसळधार पाऊस असो अथवा कुठला बंद, त्यात खंड पडत नाही.

सुमारे ३० वर्षांपूर्वी परळलाच राहणाऱ्या आणि रेस्टॉरंट चालविणाऱ्या हरकचंद यांना बाहेरगावांवरून आलेल्या गरीब मायलेकींनी टाटा कॅन्सर हॉस्पिटलचा पत्ता विचारला. सर्वसामान्यांना परवडणारे हे प्रसिद्ध हॉस्पिटल तेव्हा ते हरकचंद यांना माहिती नसल्याने त्यांनी त्या दोघींना महानगरपालिकेच्या शीव हॉस्पिटलचा पत्ता दिला. टाटा हॉस्पिटलमधील मोफत उपचारांची त्यांना स्वत:लाच माहिती नव्हती.

परळमध्ये राहूनही आपल्याला योग्य माहिती नाही, मग महाराष्ट्राच्या देशाच्या इतर भागांतून येणाऱ्या या लोकांचे काय हाल होत असतील हा प्रश्न त्यांना अस्वस्थ करून गेला. टाटा रुग्णालयाच्या परिसरात असंख्य रुग्णांचे नातेवाईक फुटपाथवरच पथारी पसरून राहतात. या रोगावरील महागडय़ा उपचारासाठी ते घरातील मौल्यवान ऐवज तसंच जमिनीचा तुकडा विकतात. पेशंटला दाखल केल्यावर हॉटेल, धर्मशाळेतही राहणे परवडत नसल्याने फुटपाथवरच मुक्काम करतात. सावला यांना या लोकांचे दु:ख, मानसिक, शारीरिक हालअपेष्टा अस्वस्थ करून गेल्या. एकीकडे पेशंटच्या वेदना तर दुसरीकडे नातेवाईकांच्या पोटातील आग.. पैशाअभावी महागडी, शक्तीवर्धक औषधे देता न आल्याने, नैराश्यपूर्ण वातावरणामुळे कुटुंबीयांची झालेली दयनीय अवस्था, लाचारी तरुण हरकचंदांच्या मनाला भिडली. या लोकांसाठी आपण काय करू शकू याचा विचार सुरू झाला. पूर्ण विचाराअंती त्यांनी स्वत:चे चांगले चाललेले रेस्टॉरंट भाडय़ाने चालविण्यास दिले. ही गोष्ट आहे २९ वर्षांपूर्वीची. तेव्हा त्यांचं वय होतं अवघं २७-२८ वर्षे. दरमहा मिळणारे नियमित भाडे व हॉटेलसाठी मिळालेले डिपॉझिट यामधून त्यांनी टाटा हॉस्पिटलसमोरच कोंडाजी चाळीमध्ये काही खोल्या भाडय़ाने घेतल्या. काही प्रमाणात रुग्णांच्या, नातेवाईकांच्या राहण्याची व्यवस्था केली आणि दररोज २५ रुग्णांच्या नातेवाईकांना डाळ, भात, भाजी, रोटी देण्यास सुरुवात केली. आता तर जे.जे. रुग्णालय, सेंट जॉर्ज व (जुलै २००७ पासून) कामा हॉस्पिटलमध्येही सुमारे ७०० व्यक्तींना दोन वेळचे जेवण मोफत देण्यात येते.

सावला म्हणतात, माझे गुरुजी खेतशी मालशी नेहमीच मला गरीब आणि असाहाय्य लोकांना मदत करण्यासाठी प्रेरणा द्यायचे. माझ्या वडिलांनी स्पष्ट सांगितले होते की असे कार्य करायचे असेल तर साधे राहा, स्वत:चा खर्च काटकसरीने कर. सुरुवातीची १२ वर्षे त्यांनी स्वत:च्या खिशातून सुरू केलेले हे कार्य वाढत गेले. त्याचा खर्च त्यांना एकटय़ाला झेपेनासा झाला. त्यामुळे मग त्यांनी ‘जीवन ज्योत कॅन्सर रिलीफ अँड केअर’ हा ट्रस्ट स्थापन केला. त्यामार्फत आता रुग्णांना दुपारचे आणि रात्रीचे जेवण दिले जाते. फुटपाथवरच जेवण करणाऱ्या पेशंटच्या शंभरपेक्षा जास्त नातेवाईकांना महिन्यातून दोन वेळा शिधा, तसंच घशाच्या कॅन्सरमुळे गिळू व खाऊ शकत नाहीत अशा रुग्णांसाठी हळद घातलेले गरम दूध दिले जाते. इथे लहानग्या पेशंटसाठी टॉय बँक आहे. याशिवाय तीन अ‍ॅम्ब्युलन्सची सेवा, बरे झालेल्यांच्या पुनर्वसनासाठी व्यावसायिक प्रशिक्षण, नैराश्यामधून रुग्ण व नातेवाईकांना बाहेर काढण्यासाठी समुपदेशन (काउन्सेलिंग) या सगळ्या सेवा दिल्या जातात. ट्रस्टतर्फे चालवल्या जाणाऱ्या ‘जीवन पथ’ या गुजराथी, हिंदी आणि इंग्रजी भाषांमधील मासिकातून कॅन्सरबद्दल सर्व प्रकारची माहिती दिली जाते.

कॅन्सरविषयी जागृती निर्माण करण्यासाठी त्यांनी नुकताच आठ जणांच्या चमूसह अरुणाचल प्रदेशातील तवांग ते गुजरात असा १२०० कि.मी.चा दौरा मोटारसायकलवरून पूर्ण केला.

दोन वर्षांपासून सुरू केलेली जीवन ज्योत औषध बँक आज जोरात सुरू आहे. रुग्णांचे नातेवाईक पेशंटचा मृत्यू झाल्यामुळे अथवा डॉक्टरांनी बदल सुचविल्याने उरलेली औषधे सावला यांना देतात. अनेक डॉक्टरांना मिळणारी औषधांची फ्री सॅम्पल्सही एकत्र केली जातात. नंतर ती डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार इतर रुग्णांना दिली जातात.

कल्याणला राहणारी सुजाता धनविजय कॅन्सरची रुग्ण आहे. तिला टाटा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नियमित यावे लागते. कॅन्सरची रुग्ण असल्यामुळे तिला नोकरी मिळत नव्हती, पण आता ती या ट्रस्टच्या कामात सहभागी होते. तिला त्या कामाचा योग्य मोबदलाही मिळतो. जीवन जगण्याची प्रेरणाच तिला सापडली आहे. अशी हजारो उदाहरणे, हजारो रुग्ण आहेत.

ट्रस्टकडे सध्या १६० पेक्षा जास्त स्वयंसेवक आहेत. रोजचा ७०० पेक्षा जास्त माणसांचा स्वयंपाक करण्यासाठी त्यांना काही गृहिणी स्वेच्छेने दोन्ही वेळेला मदत करतात. त्यांची पत्नी निर्मला स्वत: ऑफिस सांभाळतेच, पण त्यांनी आपल्या मैत्रिणींनादेखील या कामात ओढले आहे. स्थानिक कार्यकर्त्यांच्या मदतीने कलकत्ता, जळगाव तसेच मुंबईच्या उपनगरात त्यांचे काम पसरत चालले आहे.

गुजराती भाषेतील पुस्तकांचे ग्रंथालय, पाणी शुद्ध करण्यासाठी यंत्रांचा पुरवठा, शुद्ध वातावरणासाठी सार्वजनिक ठिकाणी झाडे लावणे, मुंबईतून वेगवेगळ्या ठिकाणांहून रद्दी गोळा करून, तिच्या विक्रीतून ट्रस्टसाठी नियमित उत्पन्न, अपंग व्यक्तींसाठी बैठका, जखमी व भटकी कुत्री, पक्षी यांच्यासाठी मिळालेल्या देणगीतून अ‍ॅम्ब्युलन्स घेऊन त्याद्वारे त्यांच्यावर उपचार, कबुतरखान्यांना मोफत औषध पुरवठा, मुंबईत छोटय़ा पक्ष्यांची संख्या वाढविण्यासाठी कृत्रिम घरटय़ांचे वाटप, जखमी गायींसाठी मोफत हिरवा चारा पुरवठा असे सुमारे ५० पेक्षा जास्त उपक्रम ट्रस्टतर्फे केले जातात. तुटपुंज्या पैशातून, स्वयंसेवक, कर्मचारी, आश्रयदात्यांच्या मदतीने व सावला यांच्या नेतृत्वाखाली हे काम सुरू आहे. त्यासाठी सध्या रोजचा खर्च सरासरी ३० हजारांपेक्षा जास्त आहे. या हिशेबाने वर्षांचा खर्च एक कोटीच्या आसपास आहे. दर वर्षी तीन कोटींची गरज आहे. देणगीद्वारे मिळणाऱ्या उत्पन्नातून हे कार्य चालविले जात आहे. ट्रस्टला मिळणाऱ्या देणग्यांना उत्पन्न करातून ८०जी, ३५एसी, ८० जीजीए खाली वजावट/ सवलत मिळते.

गेल्या ३५ वर्षांत १३ लाखांपेक्षा जास्त कॅन्सर रुग्ण व त्यांच्या नातलगांना मोफत जेवण व वर उल्लेखिलेल्या सेवा दिल्या जात आहेत. सावला यांच्यासारख्या ‘वेडय़ा’ लोकांमुळेच जगात माणुसकी शिल्लक आह, याचा प्रत्यय येतो.
सौजन्य – लोकप्रभा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 2, 2018 1:05 pm

Web Title: harakhchand savla helping cancer patients tata cancer hospital lokprabha article
Next Stories
1 जाणून घ्या, कोण होते जे. डे?, छोटा राजनने कशी केली त्यांची हत्या?
2 जे डे हत्या प्रकरणी छोटा राजनला जन्मठेप
3 विद्यापीठांसाठी सामाईक वेळापत्रक
Just Now!
X