पनवेलहून छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे येणाऱ्या उपनगरी गाडीच्या मोटर कोचमध्ये बिघाड झाल्यामुळे सोमवारी सकाळी हार्बर रेल्वे विस्कळीत झाली होती. त्यातच चेंबूर येथे स्थानकात बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरल्याने हार्बर मार्गावरील प्रवाशांमध्ये चांगलीच घबराट निर्माण झाली होती.
सकाळी ९.४५ वाजता रे रोड स्थानकात आलेल्य उपनगरी गाडीच्या मोटर कोचमध्ये अचानक बिघाड झाला आणि गाडी जागीच बंद पडली. अनेकवार प्रयत्न करूनही गाडी सुरू होत नव्हती. अखेर १०.३० वाजण्याच्या सुमारास पाठीमागून आलेल्या उपनगरी गाडीने ही गाडी ढकलून छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील यार्डात आणण्यात आली. यामुळे पनवेल, अंधेरी आणि वाशी येथून सीएसटीकडे येणाऱ्या गाडय़ा रखडल्याचे सूत्रांनी सांगितले. या घटनेमुळे विस्कळीत झालेली हार्बर मार्गावरील वाहतूक दुपारी तीन वाजेपर्यंत विस्कळीत होती.
रे रोड येथे रेल्वे विस्कळीत झालेली असतानाच चेंबूर रेल्वे स्थानकात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन आल्यामुळे काही काळ स्थानक परिसरात तसेच प्रवाशांमध्ये घबराट पसरली होती. बॉम्ब शोधक पथकाने संपूर्ण रेल्वे परिसर तपासल्यानंतर हा फोन म्हणजे एक अफवा असल्याचे निष्पन्न झाले होते.
तिकीट तपासनीसांचे उपोषण
रेल्वेला महसूल मिळवून देणाऱ्या तिकीट तपासनीसांना मिळणाऱ्या इन्सेन्टिव्हमध्ये वाढ करावी या मागणीसाठी पश्चिम रेल्वे मजदूर संघाने दोन दिवसांचे आंदोलन सुरू केले आहे.
विनातिकीट प्रवाशांच्या विरोधात कारवाई करून आणि नियमित तिकीट तपासणी करून रेल्वेच्या महसुलामध्ये वाढ करून देणाऱ्या तिकीट तपासनीसांना केवळ पाच टक्के इन्सेन्टिव्ह देण्यात येतो. हा इन्सेन्टिव्ह किमान २० टक्के मिळावा, या मागणीसाठी पश्चिम रेल्वे मजदूर संघाचे सरचिटणीस जे. जी. माहुरकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबई सेंट्रल येथील विभागीय रेल्वे व्यवस्थापकांच्या कार्यालयासमोर दोन दिवसांचे धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
सोमवारी या आंदोलनात तिकीट तपासनीस मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. मागणी मान्य न झाल्यास आणखी मोठे आंदोलन पुकारण्यात येईल, असा इशाराही संघाने दिला आहे.