संदीप आचार्य, मुंबई : जे.जे.रुग्णालयातील महानगर रक्तपेढीच्या माध्यमातून मुंबईतील रक्तदात्यांना ‘मागेल तेथे रक्त’ पोहोचविणारी ‘ब्लड ऑन कॉल’ ही आरोग्य विभागाची महत्त्वाकांक्षी योजना मुंबईत बंद करण्यात आली आहे. याचा मोठा फटका मुंबईतील रुग्णांना बसत असून ही योजना पुन्हा सुरू करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.

आरोग्य विभागाने २०१३ मध्ये सातारा येथे प्रायोगिक तत्त्वावर ही योजना सुरु केली होती. त्यानंतर ७ जानेवारी २०१४ पासून मुंबईसह संपूर्ण राज्यात ‘ब्लड ऑन कॉल’ योजना सुरु करण्यात आली होती. मोटर सायकलच्या माध्यमातून चाळीस किलोमीटर किंवा एक तासाच्या अंतरावरील रुग्णालयांना शीतसाखळीतून (कोल्ड चेन बॉक्स) रक्त वा रक्तघटक उफलब्ध करून देण्यात येत होते. यासाठी रक्त पिशवीच्या खर्चा व्यतिरिक्त १० किमी अंतरासाठी ५० रुपये व ११ ते ४० किमी अंतरासाठी १०० रुपये अतिरिक्त आकारण्यात येत होते. या योजनेची लोकप्रियता वेगाने वाढत होते. २०१७ पर्यंत १०४ या दूरध्वनी क्रमांकावर ४३,२४७ फोन  आले व एकूण ३५,५२२ रक्ताच्या पिशव्यांचे रुग्णालयात जाऊन रुग्णांना वितरण करण्यात आले. गेल्या तीन महिन्यापासून मुंबईत अचानक ही योजना बंद करण्यात आल्यामुळे रक्त हवे असलेल्या शेकडो रुग्णांना रक्त मिळविण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे.

जे.जे. महानगर रक्तपेढीमधून मुबलक रक्त उपलब्ध होणे अपेक्षित आहे तेथील बहुतेक उपकरणे  बंद पडली आहेत. दोन कोटी रुपये किमतीची दोन ऑटोमेशन मशिन गेली पाच वर्षे बंद असून रक्त गट तपासणी करणारी व क्रॉस मॅच करून देणारे सत्तर लाखाचे उपकरणही गेली काही वर्षे बंद आहे. याशिवाय एचआयव्हीची चाचणी करणारे एक एलआयझर मशिनही बंद आहे. सुमारे चाळीस हजार रक्तपिशव्या साठवणूक करण्याची क्षमता असलेल्या या रक्तपेढीत आज महिन्याकाठी केवळ अडीच हजार ते तीन हजार रक्ताच्या पिशव्या रक्तदानातून जमा होतात. याचाच अर्थ वर्षांकाठी सुमारे तीस हजार रक्तपिशव्या जमा केल्या जातात असे महानगर रक्तपेढीतील डॉक्टरांनी सांगितले. येथे काम करणाऱ्या डॉक्टरांना व तंत्रज्ञांना गेली अनेक वर्षे केवळ तीस हजार रुपये मानधन देण्यात येत असून आरोग्य विभागातील पूर्णवेळ डॉक्टरांना सुमारे साठ हजार तर तंत्रज्ञांना पन्नास हजार वेतन मिळत असल्यामुळे महानगर रक्तपेढीतील डॉक्टर व तंत्रज्ञ नैराश्याच्या गर्तेत सापडल्याचे  सूत्रांचे म्हणणे आहे.

या पाश्र्वभूमीवर महानगर रक्तपेढीचे सक्षमीकरण व ‘ब्लड ऑन कॉल’ योजना पुन्हा सुरु करण्याची मागणी रक्तदान क्षेत्रातील सेवाभावी संस्थांनी केली आहे.

मुंबईसारख्या शहरासाठी ब्लड ऑन कॉल ही योजना कमालीची खार्चिक ठरत असल्यामुळेच ही योजना तात्पुरती बंद करण्यात आली आहे. खाजगी रक्तपेढय़ांशी संलग्नीकरण करून ही योजना लवकरच सुरु करण्यात येईल. तसेच जे.जे. महानगर रक्तपेढीतील उपकरणाचे आयुष्यमान संपले असल्यामुळे ती बंद आहेत. नवीन उपकरणांसाठी हाफकिन संस्थेकडे मागणी नोंदविण्यात आली असून लवकरच ही यंत्रे येतील. डॉक्टर व तंत्रज्ञांच्या मानधनवाढीच्या मागणीचाही विचार केला जाईल.

-डॉ. प्रदीप व्यास, प्रधान सचिव आरोग्य