अवयवदानाला मुंबईकरांचा प्रतिसाद

अपघातात मेंदू मृत झालेल्या मुंबईतील ५८ जणांनी अवयवदान केल्यामुळे या वर्षी सुमारे १८३ रुग्णांचे प्राण वाचले आहे. तर गेल्या वर्षीच्या तुलनेत हृदयप्रत्यारोपणात सात पटीने वाढल्याचे विभागीय अवयव प्रत्यारोपण केंद्राच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

देशभरात अवयवदानाची चळवळ उभी राहावी यासाठी १९९५ पासून मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा लागू करण्यात आला, तर मुंबईत २००० मध्ये लोकमान्य टिळक रुग्णालयात (शीव) विभागीय प्रत्यारोपण केंद्र सुरू करण्यात आले. २००० ते २०१४ या काळात अवयवदानाबाबत समाज अनभिज्ञ होता. मात्र गेल्या दोन वर्षांत अवयवदान चळवळीला व्यापक स्वरूप प्राप्त झाले असून हृदयप्रत्यारोपणाबरोबरच मुंबईत २० रुग्णालयांत अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्याची परवानगी मिळाली असून १२ रुग्णालयांनी अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यासाठी नोंदणी केली आहे. २०१५ मध्ये ऑगस्ट महिन्यात सुमारे ४७ वर्षांच्या अंतरानंतर हृदयप्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर या वर्षांत फक्त पाच हृदयप्रत्यारोपण झाले आणि २०१६ या वर्षांत ३४ हृदयप्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली आहे. ही ३४ हृदयप्रत्योरापणात शस्त्रक्रिया करण्यासाठी विलंब लागू नये यासाठी ग्रीन कॉरिडोर mv09चळवळही सुरू करण्यात आली आहे. यात वाहतूक पोलीस, मुंबई पोलीस आणि अनेकदा हवाई वाहतूकही यासाठी साहाय्य करते. सण-उत्सवांच्या काळात समाजात अवयवदानाबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. यंदा गणेशोत्सवातही ५०० जणांनी अवयवदानासाठी नोंदणी केली असल्याचे सांगितले.

अवयवदान करणाऱ्यांमध्ये वाढ झाली असून अवयवांअभावी अंथरुणावर खिळलेल्या रुग्णांची संख्याही सुमारे तीन हजारांच्या घरात आहे. ही प्रतीक्षा यादी ही दिवसेंदिवस वाढत आहे. येत्या नवीन वर्षांत अवयवदात्यांना हेरून त्यांच्या कुटुंबीयांना अवयवदानाबाबत जागृती करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. सर्वसाधारण आणि सरकारी रुग्णालयांतील मेंदूमृत व्यक्ती अवयवदानात सहभागी झाले, तर मुंबईतील अवयवदानाचा प्रश्न बऱ्याच अंशी कमी होईल, असा विश्वास मुंबई विभागीय अवयव प्रत्यारोपण केंद्राचे अध्यक्ष डॉ. जी. डावर यांनी सांगितले.