02 March 2021

News Flash

‘लालबाग’च्या दरबारात संघर्ष

पत्रकाराशी पोलिसांचे गैरवर्तन

पोलिसांना धक्काबुक्की; मंडळाचा मात्र कार्यकर्त्यांला मारहाणीचा आरोप

एकीकडे सामान्य नागरिकांचे मुंबई पोलिसांवर हल्ले करण्याचे सत्र सुरू असतानाच ‘लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा’चे कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यातील संघर्षांच्या प्रसंगांमध्ये वाढ होत आहे. शनिवारी दुपारी पोलीस उपनिरीक्षक सत्यवान पवार आणि मंडळाचे कार्यकर्ते यांच्यात जोरदार धक्काबुक्की झाली. कार्यकर्त्यांच्या मुजोरीतून ही घटना घडल्याचे पोलिसांचे म्हणणे असून दुसरीकडे उपनिरीक्षक पवार यांनीच एका कार्यकर्त्यांला बेदम मारल्यानंतर हा प्रकार घडल्याचे मंडळाकडून सांगण्यात येत आहे. या प्रकाराविषयी कुठलाही गुन्हा अजूनही दाखल करण्यात आलेला नाही. दरम्यान, या प्रकाराची चित्रफीत मात्र समाजमाध्यमांवर पसरली झाली आहे.

शनिवारी दुपारी लालबागचा राजा मंडळाच्या मंडपात पोलीस उपनिरीक्षक सत्यवान पवार बंदोबस्ताला होते. त्या वेळी रोहित श्रीवास्तव याच्याशी त्यांची बाचाबाची झाली आणि पवार यांनी त्याला मारले. हे पाहून मंडळातील एका पदाधिकाऱ्याने पवार यांना जाब विचारत त्यांची कॉलर पकडल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसून येत आहे. पोलिसांना न जुमानता मंडळ कार्यकर्ते व्यक्तींना रांग मोडून दर्शनासाठी पाठवत असल्याने पवार यांनी हस्तक्षेप केला. त्यावरून वाद निर्माण झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे, तर पोलिसांनी विनाकारण कार्यकर्त्यांवर हात उगारल्याने त्याच्या कानाचा पडदा फाटल्याचे सांगत पोलिसांची मुजोरी वाढल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. या घटनेची अद्याप तक्रार करण्यात आलेली नाही. दरम्यान, या घटनेत गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी हस्तक्षेप करत पोलीस आणि कार्यकर्ते यांनी समन्वयाने काम करणे अपेक्षित असून कोणीही मर्यादाभंग करू नये, असे सांगितले.

पत्रकाराशी पोलिसांचे गैरवर्तन

पत्रकार उदय जाधव यांच्याशी रविवारी सायंकाळी लालबागचा राजा मंडळाच्या प्रवेशद्वारावर पोलिसांकडून गैरवर्तन झाल्याचे समजते. ओळखपत्र असूनही सहाय्यक पोलिस आयुक्त अजय पाटणकर यांनी जाधव यांना प्रवेश नाकारत ढकलले.

महिला पोलिसांना शिवीगाळ करणारे तिघे अटकेत

मुंबई : गणेश विसर्जनादरम्यान मद्यधुंद अवस्थेत असलेल्या तीन तरुणांनी महिला पोलीस अधिकाऱ्याला अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याची घटना शनिवारी रात्री दादर चौपाटी येथे घडली. पोलिसांनी तीनही तरुणांना अटक केली असून नंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.

दरम्यान, हा प्रकार सर्व पोलिसांसमक्ष घडल्यानंतरही एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानेच या तरुणांना सोडून देण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न केला; परंतु शिवाजी पार्क पोलिसांनी घेतलेल्या ठाम भूमिकेमुळे तरुणांना अटक झाल्याचे कळते.

गौरी-गणपती विसर्जनासाठी शनिवारी दादरच्या चौपाटीवर भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. तीन तरुण रात्री चैत्यभूमीजवळ समुद्राच्या पाण्यात खेळत असल्याचे पोलिसांनी पाहिले.

हवालदार रमेश खराडे यांनी या तिघांना हटकले आणि बाहेर येण्यास सांगितले. त्या वेळी संतोष गौडर, विनोदकुमार पारशी आणि गजानन पकाळे या तिघांनीही खराडे यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्या वेळी बंदोबस्ताला असलेल्या महिला पोलिसानेही या तीन जणांना बाहेर येण्यास सांगितले.

मद्यधुंद अवस्थेत असलेल्या तिघांनाही कुठलेच भान नव्हते. त्यांनी महिला कर्मचाऱ्यालाही अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. हा सर्व प्रकार पाहून बंदोबस्ताला उपस्थित इतर पोलिसांनी या तिघांनाही शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात आणले. दरम्यान, एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानेच या तीनही तरुणांवर अदखलपात्र तक्रारीची नोंद करून सोडून देण्यासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली. मात्र, शिवाजी पार्क पोलिसांनी ठाम भूमिका घेत गुन्हा दाखल करणारच असा पवित्रा घेतला आणि तिघांवर गुन्हा दाखल करीत अटक केले. तिघांचीही रविवारी जामिनावर सुटका करण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 12, 2016 1:52 am

Web Title: heavy crowd at lalbaug ganpati
Next Stories
1 विसर्जनस्थळी खासगी वाहनांची गर्दी
2 समुद्रकिनारीच भाविकांच्या जेवणावळी
3 जीवरक्षक उपाशी..
Just Now!
X