महिनाभर सर्वाचे प्राण कंठाशी आणणाऱ्या वरूणराजाची बुधवारी अखेर दणक्यात सुरुवात झाली. महिन्याभरात पडलेल्या एकूण पावसाच्या दुप्पट कामगिरी करत पावसाने सांताक्रूझ येथे तब्बल १८१ मिमीची नोंद केली. दुपारनंतर विश्रांती घेतलेल्या पावसाने संध्याकाळनंतर पुन्हा एकदा संततधार कायम ठेवली. पुढील २४ तासांतही पावसाचा जोर कायम राहणार असून त्यानंतर पावसाची तीव्रता कमी होईल, मात्र आठवडाअखेरीस मुसळधार पावसाचा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे.
मुंबई, ठाणे परिसरात सकाळपासून पावसाच्या सरी कोसळू लागल्या. सकाळी १० ते १२ या वेळात पावसाने अधिकच जोर धरला. नेहमीप्रमाणे यावेळीही शहराच्या दक्षिण भागापेक्षा पूर्व व पश्चिम उपनगरात पावसाचे प्रमाण अधिक राहिले. महानगरपालिकेने शहरात लावलेल्या पर्जन्यमापकानुसार दुपारी चार वाजेपर्यंत दक्षिण भागात सरासरी २७ मिमी तर पूर्व उपनगरात सरासरी १११ व पश्चिम उपनगरात सरासरी १०७ मिमी पाऊस पडला. सीएसटी स्थानक, नरिमन पॉइंट परिसरात अवघा ५ मिमी पाऊस पडला तर सर्वाधिक पावसाची नोंद भांडुप (१४२ मिमी), मुलुंड (१३१ मिमी), बोरीवली (१५१ मिमी), कांदिवली (१४५ मिमी), मालाड (१६१ मिमी) आणि सांताक्रूझमध्ये (१५६ मिमी) झाली.
सकाळी साडेआठ ते संध्याकाळी साडेआठ या वेळेत मुंबई हवामानशास्त्र विभागाच्या सांताक्रूझ येथील केंद्रात १८१ मिमी तर कुलाबा येथे अवघा १७ मिमी पाऊस पडला. एक जूनपासून १ जुलैपर्यंत सांताक्रूझ येथे ९० मिमी तर कुलाबा येथे ५७ मिमी पावसाची नोंद झाली होती.
सांताक्रूझ येथे बुधवारी १२ तासात यापेक्षाही दुप्पट पावसाची नोंद झाली. त्यामुळे सरासरीपेक्षा ४८८ मिमीने मागे पडलेल्या पावसाची कमतरता काही प्रमाणात भरून निघाली आहे. मुंबईच्या तलावक्षेत्रातही याकाळात चांगल्या पावसाची नोंद झाली.
पुढील २४ तासातही पावसाचा जोर कायम राहणार आहे. मात्र त्यानंतर दोन दिवस पावसाचा जोर ओसरणार असून शनिवार-रविवारी मात्र मुसळधार पावसाची शक्यता आहे.
– कृष्णानंद होसाळीकर, उपमहासंचालक,  मुंबई हवामानशास्त्र विभाग. 

विमानसेवेलाही फटका
मुसळधार पावसाचा फटका विमान वाहतुकीलाही बसला. सकाळच्या वेळी मुंबईहून सुटणारी विमाने तब्बल पाऊण तास उशिराने आकाशात झेपावत होती. धावपट्टीवरील दृश्यमानता कमी असल्याने विमानांचे उड्डाण काही काळ थांबवण्यात आले होते. त्यामुळे प्रवाशांना मोठा फटका बसला. सात विमाने मुंबई विमानतळावर उतरवण्याऐवजी इतर ठिकाणी वळवण्यात आली. चार अहमदाबाद, दोन बडोदा व एक विमान औरंगाबाद विमानतळावर पाठवण्यात आले.

सांताक्रुझ-चेंबूर जोडरस्त्याचा फटका?
खूप पाऊस नसताना कुर्ला स्थानकाजवळ अगदी थोडय़ा वेळात एवढे पाणी कसे साचले, असा प्रश्न रेल्वेच्या अधिकाऱ्यांनाही पडला होता. त्याची तपासणी करण्यासाठी रेल्वेने काही कर्मचाऱ्यांना नाल्याच्या काठाने चालत पाठवले होते. मात्र सांताक्रुझ-चेंबूर जोडरस्त्यासाठी उभारलेल्या मोठय़ा खांबांमुळे हे पाणी साचले असावे, असा अंदाज रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक मुकेश निगम यांनी व्यक्त केला. पण एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी हा दावा फेटाळून लावला. जनसंपर्क अधिकारी दिलीप कवठकर यांच्या मते कुर्ला परिसर खोलगट असून तेथे पूर्वापार पाणी तुंबते. ‘एससीएलआर’चे खांब बांधताना कोणताही प्रवाह खंडित करण्यात आला नव्हता. त्यामुळे रेल्वेचा हा दावा चुकीचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दहिसरमध्ये रस्ता खचला
पावसाच्या पहिल्याच तडाख्यात दहिसरमधील विठ्ठल मंदिराजवळील तुकाराम म्हात्रे रस्ता संध्याकाळी ७.३० वाजताच्या सुमारास खचला.   या रस्त्यावर सुमारे आठ मीटर बाय तीन मीटरचा खड्डा पडला. कार्यालयातून घरी जाणाऱ्या नोकरदारांची वर्दळ सुरू असतानाच ही दुर्घटना घडली. त्यामुळे या भागात गोंधळ उडाला आणि या रस्त्यावरील वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला.

हार्बर ठप्प होण्यास कारण की..
रेल्वेमार्गावर पाणी भरण्याचे नेहमीचे ठिकाण असलेल्या कुर्ला स्थानकाच्या परिसरात बुधवारीही पाणी भरले. पाऊस फार पडत नसतानाही हे पाणी साचल्याने हार्बर मार्गाची वाहतूक ठप्प झाली. डीसी-एसी परिवर्तनाच्या कामासाठी या ठिकाणी रुळावरील ११ पॉइंट्स उघडण्यात आले होते. हे पॉइंट्स साधारणपणे मे महिन्याच्या अखेरीस क्लॅप केले जातात. मात्र पाऊस लांबल्याने आणि डीसी-एसी परिवर्तनाचे काम सुरू असल्याने हे पॉइंट्स खुलेच होते. पाणी भरल्यानंतर हे पॉइंट्स बंद केल्याशिवाय वाहतूक होणे शक्य नव्हते. त्यासाठी रेल्वेच्या पॉइंट्समनना त्या जागी जाऊन हातांनी क्लॅप्स बसवावे लागले. हे काम सकाळी ११ ते दुपारी १२.५० पर्यंत चालू होते. या दरम्यान हार्बर मार्गावरील वाहतूक बंदच होती.

मानखुर्द ते मुंबई अडीच तास!
या पहिल्याच पावसात मुंबईकरांना लोकलमध्ये अडकून पडण्याच्या प्रकाराला सामोरे जावे लागले. हार्बर मार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने मानखुर्द ते मुंबई या प्रवासासाठी अडीच तास लागत होते, तर मध्य रेल्वेवरील अप धीम्या मार्गावरील वाहतूकही तब्बल एक ते दीड तास उशिराने सुरू होती. सकाळी गर्दीने फुललेल्या प्लॅटफॉर्मची स्थिती प्रत्येक स्थानकावर दुपारी दोनच्या सुमारासही तशीच होती. कुल्र्यापर्यंत गाडय़ा प्रचंड रखडत चालत असल्याने त्याचा फटका वाहतुकीला बसला. यामुळे मध्य आणि हार्बर मार्गावरील १५० सेवा रद्द करण्यात आल्या.
धरणांमध्ये केवळ १९ टक्के पाणीसाठा
राज्यात आतापर्यंत केवळ २६ टक्केच पाऊस झाला असून धरणांमध्येही १९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे यापुढे धरणांमधील पाणी केवळ पिण्यासाठीच राखून ठेवण्याचा आणि टंचाईग्रस्त क्षेत्रात टँकर सुरू करण्याचे अधिकार तहसीलदारांना देण्याचा निर्णय बुधवारी मंत्रिमंडळाच्या बठकीत घेण्यात आला. राज्यात ३० जूनपर्यंत सरासरीच्या २६.३० टक्के पाऊस झाला आहे. ठाणे, रायगड, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, पुणे, औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद, नांदेड, िहगोली, बुलडाणा, अकोला, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्य़ात सरासरीच्या ० ते २५ टक्के तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, परभणी, वाशिम, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्हयांत २५ते ५०टक्के पाऊस झाला. केवळ सांगलीत ५० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला. राज्यातील जलाशयांत १९ टक्के साठा असून १४६४ टँकर्सद्वारे १३५९ गावांना आणि ३३१७ वाडय़ांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे.