राज्यात आतापर्यंत २१२ कर्मचाऱ्यांचा करोनामुळे मृत्यू

मुंबई : करोनामुळे मृत्यू झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपातत्त्वावर नोकरी देण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला होता. परंतु गेल्या सात ते आठ महिन्यांपासून अशा अनेक कर्मचाऱ्यांचे वारस एसटीतील नोकरीसाठी हेलपाटे मारत आहेत. राज्यात आतापर्यंत २१२ एसटी कर्मचाऱ्यांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. मात्र अद्याप एकाही कर्मचाऱ्याच्या वारसाला नोकरीचे पत्र मिळालेले नाही.

करोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर एसटीची सेवा देताना अनेक कर्मचारी करोनाबाधित झाले. काहींचा मृत्यूही झाला. कामावर असताना करोनाची लागण होऊन मृत्यू झाल्यास चालक, वाहक, सुरक्षारक्षक व वाहतूक नियंत्रक यांच्या वारसांना राज्य सरकारच्या नियमानुसार ५० लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली. आतापर्यंत केवळ ११ जणांनाच ही मदत मिळाली आहे. करोनामुळे मृत्यू होणाऱ्या सर्वच कर्मचाऱ्यांच्या वारसांना एसटी महामंडळात अनुकंपातत्त्वावर नोकरी देण्याचा निर्णयदेखील घेण्यात आला होता. त्यासाठी कोणतीही अट घालण्यात आलेली नाही. मात्र आतापर्यंत मृत झालेल्या एकाही कर्मचाऱ्याच्या वारसाला नोकरीचे पत्र मिळालेले नाही. एसटीच्या मुख्यालयापासूून ते राज्यातील विभागीय कार्यालयात नोकरीसाठी अर्ज दिल्यानंतर आश्वासनांपलीकडे काही मिळत नसल्याने वारस आणि कामगार संघटनांकडून नाराजी व्यक्त के ली जात आहे.

३२ वर्षीय निखिल अकोटकर याचे महाविद्यालयीन शिक्षण सुरू असून आई, पत्नी, बहीण, भावाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्यांचे वडील गणेश अकोटकर (वय ५७) एसटीत अकोला विभागात लेखा विभागात कर्मचारी होते. त्यांचे जून २०२० मध्ये करोनामुळे निधन झाले. वाहक म्हणून नोकरी मिळवण्यासाठी त्यांनी अकोला विभागीय कार्यालयात अर्ज केला. गेल्या सात ते आठ महिन्यांपासून नोकरीसाठी हेलपाटे घालत असताना त्यांना प्रक्रिया सुरू आहे, असे कारण दिले जात असल्याचे निखिल सांगतात.

२८ वर्षीय सुदेश टाकळकर यांचे वडील  नामदेव टाकळकर (वय ५५) हे पुणे विभागात वाहक म्हणून कार्यरत होते. सप्टेंबर २०२० मध्ये त्यांचा करोनामुळे मृत्यू झाल्यानंतर सुदेश यांनी गेल्या दोन महिन्यांपासून एसटीत वाहक म्हणून नोकरी मिळण्यासाठी प्रयत्न सुरू के ले आहेत. ‘सर्व कागदपत्रे पुणे विभागीय कार्यालयाकडे दिली आहेत. टाळेबंदीमुळे आर्थिक परिस्थितीही चांगली नसून नोकरी मिळाल्यास अनेक प्रश्न सुटू शकतात,’ असे सुदेश म्हणाले.

एसटी कर्मचाऱ्यांनी करोनाकाळात मोठी मदत केली आहे. हजारो कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली. २१२ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.  अनुकंपातत्त्वावरील नोकरीसाठी वारसांना हेलपाटे मारावे लागत आहेत. अनुकंपा नोकरीची १०० पेक्षा जास्त प्रकरणे एसटी मुख्यालयाकडे प्रलंबित असून ती तातडीने निकाली काढावीत, अन्यथा संघटना न्यायालयात जाईल. – संदीप शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटना

अनुकंपातत्त्वावरील नोकरी देण्याचा निर्णय झाला आहे. ही नोकरी नियमाप्रमाणे दिली जाईल. त्याची प्रक्रि या सुरू असून ती आणखी जलदगतीने करण्याचा प्रयत्न करू. – शेखर चन्ने, व्यवस्थापैकीय संचालक, एसटी महामंडळ