अग्निशमन दलाच्या विशेष कक्षाची अद्याप प्रतीक्षाच

गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईमध्ये गगनचुंबी इमारती उभारण्याची चुरस लागल्याचे चित्र दिसत आहे. मात्र एकामागून एक अशा अनेक टोलेजंग इमारती उभ्या राहात असताना वरच्या मजल्यांवर लागलेली आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाचे हात तोकडे पडू लागले आहेत. ही बाब लक्षात घेऊन टोलेजंग इमारतींमध्ये अग्निशमन यंत्रणेची तपासणी करण्यासाठी अग्निशमन दलाचा स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यास पालिका प्रशासनाने मंजुरी दिली होती. परंतु पद भरती होऊ न शकल्याने आजतागायत हा कक्ष कार्यान्वित होऊ शकलेला नाही. टोलेजंग इमारतींमधील अग्निशमन यंत्रणेची नियमित तपासणी करता यावी यासाठी अग्निशमन दलातील अधिकारी विशेष कक्षाच्या प्रतीक्षेत आहेत.

गेल्या दोन-तीन दशकांत मुंबईत मोठय़ा प्रमाणात गगनचुंबी इमारती उभ्या राहिल्या आहेत. यापैकी काही इमारतींना लागलेल्या आगी विझवताना अग्निशमन दलाला बरेच प्रयत्न करावे लागल्याचे वारंवार दिसून आले आहे. वरच्या मजल्यावर लागलेल्या आगीपर्यंत पोहोचण्यासाठी अग्निशामकांना तारेवरची कसरत करावी लागल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे पालिका प्रशासनाने २०१२ च्या दरम्यान अग्निशमन दलाअंतर्गत गगनचुंबी इमारतींसाठी स्वतंत्र कक्ष (हायराइज सेल) स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. केवळ निर्णयच नव्हे तर या कक्षाला मंजुरीही दिली होती. मात्र मंजुरी दिल्यानंतर दोन वर्षे या कक्षाची फाईल धूळ खात पडली होती.

अंधेरीमधील लोटक बिझनेस पार्क इमारतीच्या वरच्या मजल्यांना आग लागल्यानंतर पुन्हा एकदा पालिका प्रशासनाला मंजुरी दिलेल्या गगनचुंबी इमारतींसाठीच्या स्वतंत्र कक्षाचे स्मरण झाले. या विशेष कक्षासाठी काही पदांनाही मंजुरी देण्यात आली होती. परंतु आजतागायत ही पदे भरण्यात आली नाहीत आणि त्यामुळे कक्ष कार्यान्वित होऊ शकलेला नाही. टोलेजंग इमारतींची पाहणी करणे, तेथे अग्निप्रतिबंधक उपाययोजना करण्यात आल्या आहेत की नाहीत, अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित आहे की नाही, अग्निशमन यंत्रणेतील त्रुटी आदींची तपासणी करण्याचे काम या विशेष कक्षातील अधिकाऱ्यांवर सोपविण्यात येणार होते. मात्र अग्निशमन दलातील उदासीनतेमुळे या कक्षाची आजतागायत स्थापनाच होऊ शकलेली नाही.

मुंबईमधील ठिकठिकाणच्या अग्निशमन केंद्रांमधील केंद्र अधिकारी आणि त्यावरच्या पदांवरील अधिकाऱ्यांवर आता टोलेजंग इमारतींमधील अग्निशमन यंत्रणेची तपासणी करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. दर महिन्याला दोन उंच इमारतींमधील अग्निप्रतिबंधक यंत्रणेची तपासणी करणे या अधिकाऱ्यांना बंधनकारक करण्यात आले आहे. अग्निशमन केंद्रातील दैनंदिन प्रशासकीय कामकाजाची जबाबदारी या अधिकाऱ्यांवर असते. त्याशिवाय कार्यक्षेत्रातील इमारत कोसळणे, आग लागल्यानंतर बचावकार्यासाठी घटनास्थळी या अधिकाऱ्यांना धाव घ्यावी लागते. त्याचप्रमाणे झाडावर अडकलेल्या पक्ष्याची सुटका करणे, रस्त्यावर सांडलेल्या ऑईलवर वाळू टाकणे अशा छोटय़ा-मोठय़ा कामांची जबाबदारीही अग्निशमन दलावरच सोपविण्यात आली आहेत. त्यामुळे अग्निशमन दलावर कामाचा प्रचंड ताण आहे.

उंच इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर त्यांच्या तपासणीची जबाबदारीही अग्निशमन अधिकाऱ्यांवर टाकण्यात आली आहे. अग्निशमन दलावरील कामाचा ताण लक्षात घेऊन उंच इमारतींच्या तपासणीसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला होता. मात्र अग्निशमन दलाच्या उदासीनतेमुळे हा विशेष कक्ष कार्यान्वित होऊ शकलेला नाही.