वृद्धावस्थेत आप्तेष्टांनी पाठ फिरवल्यानंतर वर्सोवा येथील उच्चभ्रू वस्तीतील फ्लॅटमध्ये गेली पाच वर्षे एकाकी आणि हलाखीचे जीवन जगणाऱ्या जयश्री गोळकर या वृद्धेचा नुकताच मृत्यू झाला. हलाखीच्या परिस्थितीत या वृद्धेचा मृत्यू झाल्याची उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे. असा मृत्यू ज्येष्ठ नागरिकांच्या नशिबी येऊ नये, असे नमूद करत ही परिस्थिती टाळण्यासाठी सरकार काय उपाययोजना करत आहे? राज्यात वृद्धाश्रमांची पुरेशी व्यवस्था आहे काय? याचा खुलासा करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
गोळकर यांचा मृत्यू झाला असला तरी अशा हालाखीच्या परिस्थितीत जगणारे असंख्य वृद्ध आहेत. त्यांच्या नशिबी असे हाल येऊ नयेत यासाठी सरकारने उपाययोजना करण्याची गरज आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे. त्याचप्रमाणे सरकारने आतापर्यंत किती वृद्धाश्रम बांधले, राज्यातील एकूण वृद्घाश्रमांची संख्या किती, ज्येष्ठांच्या समस्यांची दखल घेऊन न्याय देणारे लवाद स्थापन करण्यात आले की नाही, त्यांची देखभाल केली जाते की नाही यावर देखरेख ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली की नाही आणि ज्येष्ठांसाठी असलेल्या सुविधांची माहिती प्रसिद्धी माध्यमांद्वारे त्यांच्या मार्फत पोहोचवण्यात येते की नाही, याची माहिती द्यावी, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. न्यायमूर्ती विद्यासागर कानडे आणि न्यायमूर्ती रेवती मोहिते-ढेरे यांच्या खंडपीठासमोर याप्रकरणी सुनावणी झाली. त्या वेळी न्यायालयाने हे आदेश दिले.

न्यायालयाची खंत
* आजच्या घडीला भारतीय समाजाची नीतीमूल्ये पाळली जात नाहीत
* ज्येष्ठांचा आदर राखला जात नाही
* एकत्र कुटुंब पद्धती लयाला जाऊन विभक्त कुटुंब पद्धतीचा उदय झाला आहे
* गेल्या तीन दशकांपासून परदेशस्थ भारतीयांचे मायदेशी राहणाऱ्या वृद्ध आई-वडिलांकडे दुर्लक्ष

गोळकर यांची शोकांतिका
पतीपासून विभक्त झाल्यानंतर जयश्री गोळकर या एकटय़ाच राहत होत्या. त्या राहत असलेल्या परिसरातच त्यांचे नातेवाईक राहतात. मात्र त्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. परिणामी एकाकी राहणाऱ्या गोळकर या घरात खितपत पडल्या होत्या. शेजाऱ्यांच्या लक्षात ही बाब आली असता त्यांनी पोलिसांना कळवले. मात्र गोळकर राहत असलेला परिसर कोणत्या पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येतो यावरून वाद निर्माण झाला. मात्र गोळकर यांना मदतीचा हात काही मिळाला नाही. अखेर न्यायालयाच्या हस्तक्षेपाानंतर त्यांना मदत दिली गेली होती.