कडाक्याच्या उन्हाचा अंमल सुरू झाला असताना बुधवार, १३ मार्च रोजी वर्षांतील सर्वोच्च वीज मागणी नोंदवली गेली. गेले महिनाभर १४,५०० मेगावॉटच्या आसपास रेंगाळत असलेली वीज मागणी या दिवशी १४,७२९ मेगावॉट इतकी नोंदवली गेली.
एप्रिल किंवा मे महिन्यातील कडक उन्हाळय़ाचे दिवस हे सर्वसाधारणपणे सर्वोच्च वीज मागणी नोंदवली जाण्याचे दिवस असायचे. पण गेल्या दोन वर्षांत हे चित्र बदलले. यंदा बुधवारचा १३ मार्च हा दिवस २०१२-१३ या वर्षांतील सर्वोच्च वीजमागणीचा ठरला. त्या दिवशी राज्यातील वीज मागणी १४,७२९ मेगावॉट होती तर उपलब्धता १३,९५८ मेगवॉट इतकी होती. ७७१ मेगावॉटची विजेची तूट राहिली.
मागच्या वर्षी २०११-१२ मध्ये ऐन हिवाळय़ात सहा डिसेंबर २०१२ या दिवशी १५,६९० मेगावॉट इतकी वीज मागणी नोंदवली गेली होती. तर २०१०-११ या वर्षांतील सर्वोच्च वीज मागणी दोन फेब्रुवारी २०११ रोजी १४,६५० मेगावॉट इतकी नोंदवली गेली होती.