मोबाईल चोरून पळण्याच्या प्रयत्नात दोन चोरांना आपला जीव गमवावा लागला. गोरेगाव पश्चिमेच्या आदर्श औद्योगिक वसाहतीत मंगळवारी पहाटे ही दुर्घटना घडली. येथील एका इमारतीतून दोन तरुण चोर मोबाईल घेऊन पळत असताना रहिवाशांनी त्यांचा पाठलाग केला. त्यांच्यापासून वाचण्यासाठी या दोघांनी सातव्या मजल्यावरून उडी मारली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
गोरेगाव पश्चिमेच्या राम मंदिर रोड परिसरातील आदर्श औद्योगिक वसाहतीत आस्मी कॉम्प्लेक्स या इमारतीत लक्ष्मण नायडू (३६) राहतात. रात्री त्यांनी आपला नोकिया कंपनीचा दीड हजार रुपये किंमतीचा मोबाईल खिडकीत चार्जिगसाठी ठेवला होता. पहाटे ३ च्या सुमारास सुफियाना उर्फ राजा हयातुल्लाह खान (२०) आणि रघुवंश भगत (२०) हे दोन भुरटे चोर इमारतीत शिरले. त्यांनी खिडकीची काच सरकवून नायडू यांचा मोबाईल लंपास केला. मात्र त्यावेळी झालेल्या आवाजाने नायडू यांना जाग आली आणि त्यांनी मदतीसाठी चोर चोर असा धावा केला. त्यांचा आवाज ऐकून इमारतीचे इतर रहिवाशी जागे झाले आणि त्यांनी या चोरांचा पाठलाग सुरू केला. गोंधळल्याने हे दोघे जिन्यातून गच्चीच्या दिशेने पळाले. पण गच्चीचे दार बंद होते. त्यांनी सातव्या मजल्याच्या पॅसेजमधून उडी मारून पळण्याचा प्रयत्न केला. पण इमारतीच्या खाली असलेल्या मोटारसायकलीवर पडल्याने ते रक्तबंबाळ झाले. घटनास्थळी पोहोचलेल्या गोरेगाव पोलिसांनी त्यांनी खाजगी रुग्णालयात नेले. पण दाखल करण्यापुर्वीच त्यांचा मृत्यू झाला. हे दोन्ही भुरटे चोर गोरेगावातील भगतसिंग नगर येथे राहणारे होते.