मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे गाडी चालवून पदपथावर झोपलेल्यांना चिरडून त्यातील एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अभिनेता सलमान खानवर बुधवारी अखेर ११ वर्षांनी सदोष मनुष्यवधाचा नवा आरोप सत्र न्यायालयाने निश्चित केला. आपण निर्दोष असल्याचा दावा करीत सलमानने आरोप अमान्य केले. या आरोपामध्ये सलमान दोषी ठरल्यास त्याला दहा वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते.
गेल्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने बुधवारी त्याच्यावर आरोप निश्चित केले जातील, असे स्पष्ट केले होते. मात्र बदली झाल्याने आपण या प्रकरणाची सुनावणी घेऊ शकत नसल्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश यू. बी. हेजीब यांनी सुनावणीच्या वेळी स्पष्ट केल्यानंतर सलमानवरील आरोप निश्चित करण्याची प्रक्रिया अमर्यादित काळासाठी लांबणार असेच चित्र होते.
नव्या न्यायाधीशांपुढे सुनावणी होईपर्यंत खटल्यादरम्यान सलमान गैरहजर राहण्यास परवानगी देण्याची विनंती त्याचे वकील श्रीकांत शिवडे यांनी केली. मात्र, आरोपनिश्चितीपूर्वी असे करणे शक्य नसल्याचे न्यायमूर्तीनी स्पष्ट केले. सलमान चित्रीकरणानिमित्त दोन महिन्यांसाठी लंडनला वास्तव्यास असल्याने या प्रकरणाची सुनावणी आणखी लांबू शकते. त्यामुळे त्याच्यावर आजच आरोपनिश्चिती करण्याची विनंती अतिरिक्त सरकारी वकील शंकर एरंडे यांनी न्यायाधीशांकडे केली. ही विनंती  न्यायालयाने मान्य केली व आरोपीच्या पिंजऱ्यात बसलेल्या सलमानला त्याच्यावरील आरोप समजावून सांगितले. सलमानने हे आरोप अमान्य केले. त्यानंतर न्यायालयाने आवश्यक असेल तेव्हा हजर राहण्याचे आदेश देऊन खटल्यासाठी गैरहजर राहण्याची मुभा दिली.