महाराष्ट्रातील जनता पाणीटंचाईने हैराण झाली असताना पाणीपुरवठा विभागाचा निधीच खर्च केला जात नसेल तर दुष्काळग्रस्तांना पाणी कसे मिळणार, असा जोरदार हल्ला विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी आघाडी सरकावर केला. भीषण दुष्काळ असलेल्या मराठवाडय़ातच मोठय़ा प्रमाणावर वृक्ष लागवड कशी झाली, असा सवालही त्यांनी केला.
विधान परिषदेत गुरुवारी राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत सहभागी होताना विनोद तावडे यांनी, आघाडी सरकारच्या फसव्या योजना आणि उदासीन कारभारावर चांगलेच कोरडे ओढले. दुष्काळी भागातील जनता आणि जनावरे पाण्यावाचून तडफडत आहेत, राज्याच्या पाणीपुरवठा विभागाने मात्र निधीच खर्च केला नाही. या विभागाला ७३७ कोटी रुपयांची तरतूद होती, त्यापैकी ३०३ कोटी रुपयांचा निधी अखर्चित राहिला आहे, तर मग दुष्काळग्रस्त जनतेला पाणी कसे मिळणार, असा प्रश्न त्यांनी केला.  दुष्काळी परिस्थिती असताना १०० कोटी वृक्ष लागवडीचा धूमधडाका चालू आहे. विशेष म्हणजे दुष्काळाच्या तीव्र झळा असलेल्या मराठवाडय़ातील जालना, उस्मानाबाद, औरंगाबाद, परभणी, बीड, लातूर या जिल्ह्य़ांमध्ये एका महिन्यात मोठय़ा प्रमाणावर वृक्ष लागवड झाल्याचे कागदोपत्री दाखविण्यात आले आहे. या भागात पिण्यासाठी पाणी नाही, मग एवढी मोठी वृक्षलागवड कशी काय झाली, हे काय गौडबंगाल आहे, अशी विचारणाही तावडे यांनी केली.
अर्थसंकल्पात अनुसूचित जाती व जमातीसाठी मोठय़ा प्रमाणावर निधीची तरतूद केल्याची घोषणा केली जाते. परंतु गेल्या पाच वर्षांत अनुसूचित जातीच्या विविध कल्याणकारी योजनांसाठी जाहीर करण्यात आलेल्या निधीपैकी १६५० कोटी रुपये खर्चच केलेले नाहीत, असे त्यांनी निदर्शनास आणले. राज्य सरकार अनेक घोषणा करते, परंतु त्या अमलात येत नाहीत. कोकणसाठी स्वतंत्र वैधानिक विकास मंडळाची मागणी करूनही त्याची पूर्तता झाली नाही. मुंबईतील वाहतुकीवरचा ताण कमी पडण्यासाठी लवकराच मेट्रो रेल, मोनो रेल सुरू होईल, अशी घोषणा करण्यात आली, परंतु त्याबाबत अजून काहीच झाले नाही. राज्याच्या विकासाला चालना मिळेल, असे राज्यपालांच्या अभिभाषणात काहीही नाही, अशी टीका तावडे यांनी केली.