महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची बारावीची एखाद्या विषयाची प्रश्नपत्रिका परीक्षा सुरू होण्याच्या काही मिनिटे आधी व्हॉट्सअपच्या माध्यमातून ‘फुटण्याचे’ यंदाचे सलग तिसरे वर्ष आहे.

या आधी २०१५मध्ये बुक कीपिंग अ‍ॅण्ड अकाऊंटचा पेपर परीक्षा सुरू होण्याआधी व्हॉट्सअपवर उपलब्ध झाला होता. त्यानंतर २०१६मध्ये या विषयाची प्रश्नपत्रिका २० मिनिटे आधी व्हॉट्सअपवरून फिरत असल्याचे लक्षात आले होते. हा पेपर फोडण्यात घाटकोपर येथील शिक्षकाचा हात होता. आताही गुरुवारी सकाळी ११च्या सुमारास मराठीचा पेपर सुरू होण्याआधी एका क्लासचालकाच्या भ्रमणध्वनीवर मराठीच्या पेपरमधील काही पाने व्हॉट्सअपच्या माध्यमातून आली. ती एका विद्यार्थ्यांनेच पाठविली होती. हा विद्यार्थी मराठीला पर्यायी असलेल्या ‘माहिती तंत्रज्ञान’ विषयाचा होता. या क्लासचालकाने एका वर्तमानपत्राच्या पत्रकाराच्या हा प्रकार लक्षात आणून दिला. त्यांनी याबाबत मुंबईच्या विभागीय मंडळाच्या अध्यक्षांना कळविले. तोपर्यंत परीक्षा सुरू झाली होती. पेपर १०.४६च्या सुमारास संबंधित क्लासचालकाच्या व्हॉट्सअपवर आला होता. ‘आम्ही आमच्याकडे आलेले सर्व पुरावे पोलीस अधिकाऱ्यांना सादर केले आहेत. त्यांच्या चौकशीनंतर प्रश्नपत्रिका फुटीचा आवाका नेमका लक्षात येईल. परंतु, प्रथमदर्शनी तरी प्रश्नपत्रिका परीक्षेच्या केवळ १५ मिनिटे आधी उपलब्ध झाल्याचे लक्षात येत आहे. याचा अर्थ ती फुटली असा घेता येत नाही,’ असे स्पष्टीकरण मुंबई विभागीय मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांनी दिले.

प्रश्नपत्रिकेचे गठ्ठे परीक्षेपूर्वी काही तास आधी परीक्षा केंद्रांवर पोहोचतात. एक तास आधी त्याचे सील काढले जाते. त्यानंतर प्रश्नपत्रिकेची छायाचित्रे काढली गेली असावी, असा अंदाज त्यांनी वर्तवला. त्यामुळे जोपर्यंत प्रश्नपत्रिका फुटीचा आवाका लक्षात येत नाही तोपर्यंत तरी ती फुटली आहे, हे स्पष्ट होणार नाही, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

हिंदीचीही प्रश्नपत्रिका फुटली?

रिलायबल क्लासेसचे नरेंद्र बांबवानी यांच्याकडे गुरुवारी विद्यार्थ्यांमार्फत मराठीची प्रश्नपत्रिका आली होती. त्यांनीच पत्रकारांना सतर्क केल्याने हा प्रकार उघडकीस तरी आला. ‘केवळ मराठीच नव्हे तर १ मार्चला म्हणजे बुधवारी झालेल्या हिंदी या विषयाची प्रश्नपत्रिकाही आमच्या काही विद्यार्थ्यांना परीक्षेआधी व्हॉट्सअपवर आली होती. मात्र, त्या बाबतचे पुरावे आमच्याकडे नसल्याने या संबंधी तक्रार करू शकलो नाही,’ अशी माहिती त्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.