बंगालच्या उपसागरातून ओदिशाकडे येत असलेले हुडहुड चक्रीवादळ अतितीव्र स्वरूपातील असून जमिनीवर आल्यावर हे वारे वायव्य दिशेला सरकल्यास विदर्भ आणि पूर्व मराठवाडय़ात पाऊस पडू शकेल. मात्र, सध्या तरी हे वादळ जमिनीवर आल्यावर उत्तरेकडे मध्य प्रदेश किंवा बिहारकडे सरकण्याची शक्यता आहे.
हे चक्रीवादळ अतितीव्र स्वरूपाचे असून ताशी १२० किलोमीटरहून अधिक वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. सामान्यत: चक्रीवादळ जमिनीवर आल्यावर तीव्रता कमी होऊन त्याचे रूपांतर कमी दाबाच्या पट्टय़ात होते. आजूबाजूच्या परिसरात जोरदार वारे तसेच पाऊस पडण्याचा परिणाम एक ते दोन दिवस राहतो.  हे वादळ वायव्येकडे सरकल्यास विदर्भ तसेच या वर्षी ५० टक्क्यांहून कमी पाऊस झालेल्या पूर्व मराठवाडय़ात १२ आणि १३ ऑक्टोबर रोजी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मुंबईवर परिणाम नाही
हे वादळ पूर्व किनारपट्टीवर येत असल्याने त्याचा मुंबईवर परिणाम होण्याची शक्यता नाही. मात्र या वादळामुळे मान्सून आणखी काही काळ रेंगाळणार आहे. चक्रीवादळ असताना किनारपट्टीवरील भागातून मान्सून माघारी परतण्याची शक्यता वर्तवली जात नाही. त्यामुळे डहाणूच्या उत्तर भागातून मान्सून माघारी परतल्याचे जाहीर झाले असले तरी वादळ शमेपर्यंत मान्सून परतल्याचे अधिकृतरीत्या जाहीर होणार नाही.