News Flash

भारत पाकिस्तानच्या सापळ्यात अडकतोय!

‘एका लक्ष्यभेदी हल्ल्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील समस्या सुटू शकणार नाहीत. दहशतवादामुळे भारत पाकिस्तानवर संतापलेला आहे, हे मला समजतेय.

पाकिस्तानी मुत्सद्दी हुसेन हक्कानी यांची भीती

‘एका लक्ष्यभेदी हल्ल्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील समस्या सुटू शकणार नाहीत. दहशतवादामुळे भारत पाकिस्तानवर संतापलेला आहे, हे मला समजतेय. पण भारत पाकिस्तानवर एवढा वेळ का वाया घालवत आहे?’ अमेरिकेतील पाकिस्तानचे माजी राजदूत आणि आता अमेरिकेत सक्तीने विजनवास सोसत असलेल्या हुसेन हक्कानी यांचा हा सवाल. तो करतानाच, दोन्ही देशांमधील वैरभाव जिवंत राहावा या उद्देशाने पाकिस्तानने रचलेल्या सापळ्यात भारत अडकेल की काय, अशी भीतीही हक्कानी यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली आहे.

जागतिक पातळीवरील विचारगट म्हणून लौकिक असलेल्या, वॉशिंग्टनच्या हडसन इन्स्टिटय़ूटमध्ये हक्कानी हे ‘सीनिअर फेलो’ आणि संचालक (दक्षिण आणि मध्य आशिया) म्हणून काम करतात. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ आणि माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांचे ते एकेकाळचे निकटचे सहकारी. त्यांनी तत्कालीन अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्यावर टीका केली आणि त्यामुळे त्यांचे मायदेशाशी वितुष्ट आले. शरीफ यांच्या राजवटीत ते अमेरिकेत पाकिस्तानचे राजदूत होते. त्या वेळी अमेरिकेने पाकिस्तानमध्ये थेट हस्तक्षेप करावा, असे सूचनापत्र त्यांनी अमेरिकेस पाठविले असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आणि तेव्हापासून ते पाकिस्तानला नकोसे झाले.

भारत-पाक संबंधांबाबत ते अत्यंत मनमोकळेपणाने बोलले. ‘पाकिस्तान सध्या सगळे नाकारण्याच्याच भूमिकेत’ असल्याचे मान्य करून ते म्हणाले, ‘भारताबाबत पाकिस्तानच्या काही कायदेशीर तक्रारी, गाऱ्हाणी आहेत. पण जोवर पाकिस्तान दहशतवादाचा नि:पात करीत नाही तोवर आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर त्यांचे कोणी ऐकणार नाही. दहशतवादाला पाठिंबाही द्यायचा आणि त्याच वेळी आपल्याला त्याचा त्रास होऊ नये अशी इच्छाही बाळगायची असे पाकिस्तानला करता येणार नाही.’

त्यांच्या म्हणण्यानुसार, ‘भारताच्या वेगवान लष्करी कारवाईमुळे पाकिस्तानला वास्तवाचे भान येईल, असे नाही. तर सातत्याने केल्या जाणाऱ्या राजकीय, आर्थिक आणि राजनैतिक प्रयत्नांतूनच केवळ पाकिस्तानात बदल होईल. भारताने आता जशी लष्करी कारवाई केली, तशा कारवाईत काही सैनिक ठार झाले म्हणून पाकिस्तानला काहीही फरक पडणार नाही. कारण पाकिस्तानच्या भूमीतच दहशतवादी हल्ल्यांमध्ये अनेक नागरिकांचे बळी गेले आहेत.

दहशतवादाने पाकिस्तानातही हाहाकार माजवला आहे. त्यामुळे त्याचा नि:पात करणे हेच खरे पाकिस्तानसाठी सर्वात महत्त्वाचे आहे. पाकिस्तानने भारतासाठी म्हणून दहशतवादाचा खात्मा करावा असे आपणास म्हणायचे नाही, तर आपल्या स्वार्थासाठी पाकिस्तानने ते करायला हवे.’

हे सांगतानाचभारताच्या सध्याच्या आक्रमक धोरणाबद्दल मात्र त्यांनी काहीशी साशंक चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, ‘केवळ मध्यरात्रीच्या एका कारवाईमुळे किंवा वाहिन्यांवरील चर्चेने भारत-पाकिस्तानातील तिढा सुटणार नाही. भारताने हे समजून घेतले पाहिजे, की अखेरीस पाकिस्तानला जिहादींविरुद्ध कारवाईस भाग पाडील तो केवळ त्याच्यावर येणारा पुरेसा दबाव. आता जे काही सुरू आहे त्यामुळे दोन्ही देशांमध्ये केवळ तिरस्कारच कायम राहील. किंबहुना तो वाढेल.’

‘दोन्ही देशांना काश्मीरचा प्रश्न सोडविण्याची इच्छा असेल तर त्यांनी प्रथम एकमेकांचे मित्र बनणे गरजेचे आहे.’ हे सांगताना हक्कानी यांनी अमेरिका आणि कॅनडाचे उदाहरण दिले. ‘या दोन्ही देशांमध्ये अद्याप नऊ प्रलंबित प्रश्न आहेत. असे असले तरी दोन्ही देश अनेक बाबींमध्ये पुढेच जात आहेत. ते थांबलेले नाहीत. भारत आणि पाकिस्तानला याचेच अनुकरण करावे लागेल.’

दोन्ही देशांमधील वैरभाव जिवंत राहावा या उद्देशाने पाकिस्तानने रचलेल्या सापळ्यात भारत अडकेल अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. दहशतवादाचा नि:पात करण्यासाठी भारत पाकिस्तानला कसे भाग पाडतो त्यावर भारताचे यश मोजता येईल आणि बिगरलष्करी मार्गानीच ते शक्य होईल, असे मत हक्कानी यांनी व्यक्त केले. ‘भारताला यश मिळावे अशी सर्व जगाची भावना आहे. भारताकडे सगळे जग ‘भविष्यातील चीनच्या आकाराची अर्थव्यवस्था’ या नजरेने पाहात आहे. त्यामुळे भारताने पाकिस्तानवर नाहक वेळ आणि शक्ती खर्च करू नये,’ असे आपणास वाटत असल्याचे ते म्हणाले.

अर्थात दहशतवादावर नियंत्रण ठेवण्यासाठी पाकिस्ताननेच अधिक प्रयत्न करण्याची गरज असल्याचेही त्यांनी या वेळी कबूल केले. ‘हे करणे का गरजेचे आहे ते पाकिस्तानने समजून घेतले पाहिजे.

१९४७ मध्ये पाकिस्तानात १६ टक्के साक्षर होते, तर भारतात १८ टक्के. केवळ दोन टक्क्यांचाच फरक होता. आता तो २२ टक्क्यांवर गेला आहे. भारतामध्ये साक्षरतेचे प्रमाण ७५ टक्के आहे तर पाकिस्तानात केवळ ५३ टक्के.

जागतिक पातळीवर १३८ देशांमध्ये भारत ३९व्या स्थानावर आहे तर पाकिस्तान १३२व्या स्थानावर. पाकिस्तानात इतकी गरिबी आहे की तेथे जन्मलेल्या मुलांपैकी एक तृतीयांश मुले शाळेतच जात नाहीत. मदरशांमध्येही जात नाहीत,’ असे हक्कानी म्हणाले.

हक्कानी हे स्वत: एक लेखक आहेत. चर्चेच्या अखेरीला त्यांनी एक इच्छा व्यक्त केली. ते म्हणाले, ‘हफीज सईदसारखे नाही, तर माझ्यासारखे लोक हे पाकिस्तानचा चेहरा असले पाहिजेत. पण पाकिस्तानने मला देशद्रोही ठरविले आणि हफीज सईदला नायक.’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 2, 2016 1:15 am

Web Title: husain haqqani comment on surgical strikes on pak
Next Stories
1 कुपोषण, बालमृत्यूविरोधात मोहीम
2 समाजसेवेला मदतीचे बळ
3 मराठवाडय़ात ६६ वसतिगृहे सुरू करणार
Just Now!
X