News Flash

मुंबईतील फाइव्ह स्टार हॉटेल बंद : १९३ कर्मचाऱ्यांचे गंभीर आरोप; न्यायालयाने दिला मोठा दिलासा

हॉटेलच्या मालकाकडे कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी, कारभार चालवण्यासाठी निधी उपलब्ध नसून हॉटेल व्यवसायामधून टीकून राहण्यासाठी हॉटेल बंद करत असल्याचं सांगण्यात आलं

मुंबईतील हयात रेजन्सीची मालकी असणाऱ्या एशियन हॉटेल्स (वेस्ट) कंपनीसमोर आर्थिक संकट निर्माण झालं आहे. हॉटेल व्यवसायामध्ये टिकून राहण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात सर्व कारभार थांबवण्याचा निर्णय कंपनीने घेतलाय. (प्रातिनिधिक फोटो, फोटो सौजन्य: हयात डॉट कॉम आणि रॉयटर्सवरुन वरुन साभार)

मुंबईतील प्रसिद्ध अशा हयात रेजन्सी हॉटेलने सोमवारी रात्री तडकाफडकी हॉटेलचा कारभार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हॉटेलच्या मालकाकडे कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी आणि कारभार चालवण्यासाठी निधी उपलब्ध नसून हॉटेल व्यवसायामधून टीकून राहण्यासाठी तात्पुरत्या काळासाठी हॉटेल बंद करत असल्याचं कर्मचाऱ्यांना सांगण्यात आलं आहे. या निर्णयानंतर आता या हॉटेलमध्ये काम करणाऱ्या १९३ कर्मचाऱ्यांनी औद्योगिक न्यायालयामध्ये धाव घेतली आहे. न्यायलायने पुढील सुनावणी २८ जून रोजी असल्याचं स्पष्ट करत या तारखेपर्यंत कंपनीला कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करता येणार नसल्याचं न्यायालयाने म्हटलं आहे. कर्मचाऱ्यांनी मागील दोन महिन्यापासून आम्हाला पगार देण्यात आला नव्हता तसेच सोमवारी हॉटेल बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला त्यावेळी हॉटेलमध्ये ६० ते ८० टक्के बुकींग मागील काही दिवसांपासून फुल्ल असल्याचा दावाही करण्यात आलाय.

आर्थिक संकटामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं हॉटेलची मालकी असणाऱ्या कंपन्यांनी स्पष्ट केलं आहे. दिल्लीमध्ये हयात रेजन्सीचं मुख्यालय असून अनेक कंपन्यांकडे देशभरातील मुख्य शहरांमध्ये पंचारांकित हॉटेल चालवणाऱ्या कंपन्यांची मालकी आहे. देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये हॉटेल्स असली तरी दिल्ली आणि मुंबईमधील हयात रेजन्सी ही कंपनीची मुख्य हॉटेल्स असून त्यापैकीच मुंबईतील हॉटेल बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईथील सहारा विमानतळ मार्गावर असणारे हॉटेल सोमवार रात्रीपासून बंद करण्यात येत असलं तरी दिल्लीतील हॉटेल सुरु राहणार असल्याचं कंपनीने स्पष्ट केलं आहे. करोना कालावधीतील निर्बंध, कमी झालेली पर्यटक संख्या यासाऱ्या गोष्टींमुळे कंपनीसमोर अनेक आर्थिक प्रश्न निर्माण झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

कंपनीवर ४ कोटी ३२ लाखांचं कर्ज…

मुंबईतील हयात रेजन्सीची मालकी असणाऱ्या एशियन हॉटेल्स (वेस्ट) कंपनीकडे आहे. इकनॉमिक टाइम्सने दिलेल्या बातमीनुसार या कंपनीने यस बँकेकडून घेतलेलं ४ कोटी ३२ लाखांचं कर्ज थकलेलं आहे. अशाच आता कंपनीने हॉटेल बंद करण्याचा निर्णय घेतल्याने येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नोकरी जाण्याची भीती असल्याने त्यांनी न्यायालयामध्ये धाव घेतली आहे. कंपनीने केलेल्या खुलाश्यानुसार यस बँकेने कंपनीच्या व्यवहारांवर निर्बंध घातले आहेत. करोनामुळे आम्हाला बँकेचं कर्ज फेडता आलं नसल्याचा दावा कंपनीने केलाय. आम्हाला सध्या सरकारी कर, व्हेंडर्सचे पैसे आणि कर्मचाऱ्यांचा पगार देता येणार नाहीय. कंपनीच्या व्यवहारांवर बँकेकडून बंदी घालण्यात आल्याचा दावा, एशियन हॉटेल्स (वेस्टने) केला आहे.

हयात समुहाचे म्हणणे काय?

यासंदर्भात हयातचे उपाध्यक्ष आणि भारतामधील प्रमुख असणाऱ्या सुजेय शर्मा यांनी अधिक माहिती दिली आहे. “मुंबईतील हयात रेजन्सीची मालकी असणाऱ्या एशियन हॉटेल्स (वेस्ट) कंपनीसमोर आर्थिक संकट निर्माण झालं आहे. हॉटेल व्यवसायामध्ये टिकून राहण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात मुंबई हयात रेजन्सीचा सर्व कारभार थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत हे हॉटेल बंद राहणार आहे. या हॉटेलसाठी कोणत्याही पद्धतीचं बुकींग करता येणार नाही. हयात समुहामध्ये आमचे सहकारी आणि पाहुणे हे आमची प्राथमिकता असतात. सध्याच्या परिस्थितीवर मार्ग काढण्यासाठी आम्ही हॉटेल मालकांसोबत चर्चा करत आहोत,” असं शर्मा यांनी स्पष्ट केलं आहे.

कर्मचाऱ्यांना कल्पना देण्यात आल्याचा दावा

मुंबईमधील हयात रेजन्सीचे महाव्यवस्थापक हरदिप मारवाह यांनी हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना हॉटेलचे मालक पगार देण्यासाठी किंवा हॉटेलचा आर्थिक कारभार चालवण्यासाठी निधी उपलब्ध करुन देत नसल्याचं सांगण्यात आल्याची माहिती दिली. याच कारणामुळे पुढील सूचना मिळेपर्यंत हॉटेल बंद ठेवण्यात येणार असल्याचंही हरदिप यांनी स्पष्ट केलं आहे.

मागील अनेक महिन्यांपासून हॉटेलचे व्यवहार मंदावले

दिल्लीमधील हयात रेजन्सीची मालकी एशियन हॉटेल्स (नॉर्थ) या कंपनीकडे असून कंपनीने मागील अनेक महिन्यांपासून आपल्या वेबसाईटवरुन बुकींग करण्याची सेवा बंद केलीय. “दिल्लीमधील हॉटेल सुरु आहे. कोणाला बुकींग करायीच असल्यास थेट हॉटेलमध्ये फोन करुन बुकींग करता येईल किंवा थर्ड पार्टीच्या माध्यमातून बुकींग करता येईल,” असं उत्तर हयात रेजन्सी दिल्लीने मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात दिल्याचं टाइम्स ऑफ इंडियाने म्हटलं आहे. त्यानंतर सहा महिने उटले असले तरी हयात रेजन्सी दिल्लीची परिस्थिती ‘जैसे थे’च असल्याचे चित्र दिसत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 8, 2021 4:56 pm

Web Title: hyatt regency mumbai shut down 193 employees of the hotel moved to industrial court scsg 91
Next Stories
1 “जेव्हा ठाकरे-मोदी भेटतात, तेव्हा चर्चा तर होणारच”, संजय राऊतांची सूचक प्रतिक्रिया!
2 Rain in Mumbai : मंबईत मान्सूनच्या सरी बरसणार! कुलाबा वेधशाळेनं दिली आनंदाची बातमी!
3 “…जो मरने के बाद भी सिस्टम को नंगा कर गई”, जितेंद्र आव्हाडांचं सूचक ट्विट!
Just Now!
X