ठाकरे सरकारचा रिमोट माझ्या हाती नाही असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटलं आहे. महाविकास आघाडीचं सरकार हे पाच वर्षे टीकणार आहे त्यात काहीही अडचण येणार नाही असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. एबीपी माझाच्या व्हिजन २०२० या कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी हे विचार मांडले आहेत. उद्धव ठाकरे हे जो राज्यकारभार करत आहेत यासाठी त्यांना किती मार्क द्याल? असं विचारलं असता शरद पवार म्हणाले की मार्क देण्यासाठी अजून परीक्षेची वेळच आलेली नाही. मात्र एवढं ठाऊक आहे की उद्धव ठाकरेंचा मार्ग योग्य आहे.

विचारल्याशिवाय मी कोणत्याही गोष्टीचा सल्ला देत नाही असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं. राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाला आहे याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केलं. इतकंच नाही तर हे सरकार पाच वर्षे चालणार याची मला खात्री आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. शिवाय आमच्यात कोणतीही कटुता नाही असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं. “ठाकरे सरकारचा रिमोट माझ्या हाती नाही. सगळं काही सुरळीत चालू लागल्यावर मी लांब झालो. आवश्यता भासली तरच सल्ला द्यायचा अन्यथा लांब रहायचे असे मी ठरवले आहे” असंही शरद पवार यांनी स्पष्ट केले.

“मला स्वतःला ठाकरे सरकारबाबत कोणतीही शंका नाही. हे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार याची मला खात्री आहे. सरकारचं नेतृत्व ज्यांच्या हाती आहे ते सगळ्यांना सोबत घेऊन चालणारे आहेत आणि ते दुसऱ्यांच्या कामात मुळीच हस्तक्षेप करत नाहीत. ”

” शिवसेना म्हणून आमचा कधी संपर्क आला नव्हता. मात्र बाळासाहेब ठाकरे हे माझे खूप चांगले मित्र होते. त्यांच्यासोबत खूप चांगला संपर्क होता. त्यांनी एखादा शब्द दिला तर ते तो शब्द पाळायचे. काँग्रेसचे निर्णय दिल्लीत होतात. आज काँग्रेसने निर्णय घेण्याच्या पद्धतीत बदल केला असून सहकार्य करायचे आणि सरकार टीकवायचे या भूमिकेत काँग्रेस आहे असे दिसत आहे” असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.