ईडी कार्यालयात जाण्याचा निर्णय शरद पवार यांनी तूर्तास तहकूब केला आहे. स्वतः शरद पवार यांनीच सिल्वर ओक या त्यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर येऊन ही माहिती दिली. “ईडी कार्यालयात मी जाणार आहे हा निर्णय मी २४ तारखेला झालेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केला होता. शिखर बँक घोटाळा प्रकरणात ज्या संचालकांची नावं आहे त्यात मलाही सहभागी करण्यात आलं. मात्र मी या बँकेच्या संचालक पदी कधीही नव्हतो. तरीही माझं नाव यामध्ये सहभागी करण्यात आलं. त्यामुळे यासंदर्भात हवं ते सहकार्य करण्याची माझी भूमिका मांडली. मात्र आज राज्य सरकारच्या वतीने पोलीस आयुक्त आणि सहाय्यक पोलीस आयुक्त यांनी माझी भेट घेतली. आपण ईडी कार्यालयात गेलात तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं मला त्यांनी सांगितलं. तसंच ईडीने मला ईमेल करुन तूर्तास तुम्ही येण्याची आवश्यकता नाही असंही सांगितलं. जेव्हा आम्हाला गरज वाटेल तेव्हा आम्ही तुम्हाला बोलवू असंही त्यांनी मला सांगितलं. मी स्वतः गृहखात्याची जबाबदारी सांभाळली आहे त्यामुळे कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मी तूर्तास ईडी कार्यालयात जाण्याचा निर्णय तहकूब केला आहे” असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं.

” निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात निवडणूक जाहीर केली आहे. त्यामुळे मी मुंबईच्या बाहेर असण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे मी माझ्या परिने पूर्ण सहकार्य करायचं ठरवलं होतं. मात्र ईडीने मला तूर्तास तुम्ही येण्याची आवश्यक नाही असं स्पष्ट केलं आहे. तुम्हाला चौकशीसाठी बोलावायचं असेल तेव्हा आम्ही पूर्वसूचना देऊ असं सांगण्यात आलं. अशा सगळ्या परिस्थितीत जर मी ईडी कार्यालयात गेलो तर कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण होईल. मुंबईकरांच्या काळजीपोटी आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मी ईडी कार्यालयात जाण्याचा निर्णय तूर्तास तहकूब करतो आहे” असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं.

” ईडीने माझ्या विरोधात जो गुन्हा दाखल करण्याची भूमिका घेतली आहे त्यामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट आहे. त्याची प्रचिती महाराष्ट्राच्या शहरांमध्ये, जिल्ह्यांमध्ये दिसू लागली. मुंबई शहरात येणाऱ्या लोकांना मोठ्या प्रमाणावर मुंबईच्या बाहेरच अडवलं जातं आहे अशा प्रकारच्या तक्रारीही आमच्यापर्यंत आल्या. पोलीस आयुक्तांनी विनंती केली की आपण जर गेलात तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न मुंबईत निर्माण होईल. ते होऊ नये म्हणूनच मी ईडी कार्यालयात न जाण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या एखाद्या निर्णयाची किंमत सामान्य माणसाला मोजावी लागावी ही गोष्ट मला मंजूर नाही म्हणून मी ईडी कार्यालयात जाण्याचा निर्णय तूर्तास तहकूब करतो आहे” असं प्रतिपादनही शरद पवार यांनी केलं.