मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासंबंधी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. सरकार आरक्षण देण्यास तयार आहे. आंदोलन थांबल्यास आरक्षण देण्यास सरकार तयार आहे असेही नारायण राणे यांनी स्पष्ट केले. तसेच मी मराठा समाजाच्या नेत्यांनाही भेटलो. त्यांचे म्हणणे ऐकून घेतले, आता उद्या पुन्हा एकदा मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मराठा समाजाच्या मागण्या त्यांच्यापुढे मांडेन. आंदोलनाला लागलेले हिंसक वळण थांबले पाहिजे, जाळपोळ, तोडफोड यामुळे राज्याचे नुकसान होते आहे. हे थांबले पाहिजे असे मुख्यमंत्र्यांना वाटते आहे असेही नारायण राणे यांनी स्पष्ट केले. येत्या दोन दिवसात मराठा नेते आणि मुख्यमंत्र्यांची भेट मी घडवून आणेन आणि आरक्षणाचा तिढा सोडवण्यास मदत करेन असेही नारायण राणेंनी म्हटले आहे. नारायण राणे यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत आपले म्हणणे मांडले आहे.

हे सरकार आरक्षण देण्यासाठी  सक्षम आहे. राणे समितीच्या अहवालात यासंबंधीची तरतूद आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात सरकार सकारात्मक आहे. मुख्यमंत्र्यांशी मी याच संदर्भात आज चर्चा केली. मुख्यमंत्री यासाठी अनुकूल आहेत, उग्र आंदोलने आणि हिंसक आंदोलने थांबली तर चर्चा सुरू होईल असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचे नारायण राणे यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेवर प्रतिक्रिया नाही

या पत्रकार परिषदेत नारायण राणे यांना विचारण्यात आले की मराठा आरक्षणाचा मुद्दा हाताळण्यात मुख्यमंत्री अपयशी ठरल्याने त्यांचे पद जाण्याची शक्यता आहे का? त्यावर राणे यांनी स्पष्ट केले की मी इथे आरक्षण आणि आंदोलन या मुद्द्यावर बोलण्यासाठी आलो आहे. कोणतीही राजकीय प्रतिक्रिया देणार नाही. इतकेच नाही तर सरकार आरक्षण देण्यासाठी अनुकूल आहे. मराठा समाजाच्या बांधवांनी चर्चेसाठी तयार व्हावे असे त्यांना वाटते आहे असेही राणेंनी स्पष्ट केले.