मुंबई: इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठात (इग्नू) आता ज्योतिषशास्त्र शिकवण्यात येणार आहे. काही वर्षांपूर्वी विद्यापीठ अनुदान आयोगाने अशाच स्वरूपाचा अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी केलेला प्रयत्न देशभरातील अभ्यासक आणि वैज्ञानिकांनी हाणून पाडला होता. मात्र आता इग्नू पुन्हा एकदा अशाच स्वरूपाचा घाट घालत असल्याचे दिसत आहे.

इग्नू यंदापासून ज्योतिषशास्त्रात पदव्युत्तर पदवी (एमए) आणि पदविका (डिप्लोमा) सुरू करणार आहे. नुकतेच या अभ्यासक्रमाचे उद्घाटन झाले. हिंदी आणि संस्कृत माध्यमातून हा अभ्यासक्रम होईल. विद्यापीठाच्या ५७ प्रादेशिक केंद्रांवर हा अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ग्रह-ताऱ्यांचा मानवी जीवनावर कसा परिणाम होतो यावर हा अभ्यासक्रम बेतलेला असेल. ज्योतिषशास्त्र, ग्रह-ताऱ्यांचे परिणाम, कुंडली याबाबत अनेक मतभेद आहेत. मात्र आता त्याला स्वतंत्र विद्याशाखेचा दर्जा देण्याचा घाट इग्नूने घातला आहे. ग्रहणांबाबत खगोल अभ्यासकांकडून जनजागृतीवर भर देण्यात येत असताना या अभ्यासक्रमात मात्र ग्रहणांचे मानवी जीवनावर होणारे परिणाम असा घटक समाविष्ट करण्यात आला आहे. प्राचीन ऋषींची मते काय होती, त्याचा आधार घेऊन घटकांची मांडणी करण्यात आल्याचे इग्नूचे म्हणणे आहे. विज्ञानप्रेमींकडून सातत्याने याबाबतच्या दाव्यांना आव्हाने दिले जाते. त्यामुळे राष्ट्रीय विद्यापीठाने सुरू केलेला हा अभ्यासक्रम वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे.

अभ्यासक्रमात काय?

भारतीय ज्योतिषाचा परिचय आणि इतिहास, सिद्धांत ज्योतिष आणि काळ, पंचाग, मुहूर्त, कुंडली, फलविचार, गणित, ग्रहणवेध आणि यंत्र, संहिता ज्योतिष, ज्योतिर्विज्ञान, वेदांग ज्योतिष

वादाचा इतिहास

यापूर्वी २००१ मध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाने अशाच स्वरूपाचा अभ्यासक्रम सुरू केला होता. तेव्हा शास्त्रज्ञांनी अशा स्वरूपातील अभ्यासक्रमाला विरोध केला होता. त्यानंतर हा अभ्यासक्रम रद्द करण्यात आला.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून विरोध 

मुंबई : इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने (इग्नू) सुरू केलेल्या ज्योतिषशास्त्र अभ्यासक्रमाला विरोध दर्शवत तो तातडीने रद्द करावा, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (अंनिस) केली आहे.