‘आयआयटी’ मुंबईत झालेल्या १५ ते २० टक्के शुल्कवाढीच्या विरोधात विद्यार्थ्यांनी छेडलेल्या आंदोलनानंतर प्रशासनाने शुल्कवाढ काही प्रमाणात मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शुल्क सुमारे दोन हजारांनी कमी होणार आहे.

आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्यांनी शुल्कवाढीविरोधात जून महिन्यापासून आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनानंतर प्रशासनाने श्वेतपत्रिका काढत विद्यार्थ्यांशी त्यांच्या मागण्यांवर चर्चा केली. या सर्व बैठकांनंतर अखेर संस्थेच्या नियामक मंडळाने हा निर्णय घेतला.  शुल्क कपात करत असताना नोंदणी शुल्क ५०० वरून २५० रुपये, तर जिमखाना शुल्क १२५० वरून एक हजार रुपये करण्यात आले आहे. वैद्यकीय शुल्क एक हजार रुपयांवरून ५०० रुपये इतके करण्यात आले आहे. तर खानावळीचे दर १५०० रुपयांवरून १२५० रुपये इतके करण्यात आले आहे. तर विद्यार्थी कल्याण निधी एक हजार रुपयांवरून ५०० रुपये इतका करण्यात आला आहे. यामुळे २०५० रुपये शुल्क वाढ कमी झाली आहे.

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश

विद्यार्थ्यांना विचारात न घेता केलेल्या शुल्कवाढीला विद्यार्थ्यांनी तीव्र विरोध केला होता. यासाठी संकुलात आंदोलनही करण्यात आले. या सर्वाचे यश आम्हाला मिळाल्याची भावना विद्यार्थी व्यक्त करत आहेत.  यापुढे शुल्कवाढ करत असताना विद्यार्थी प्रतिनिधींनाही त्या प्रक्रियेत सहभागी करून घेण्याचाही महत्त्वपूर्ण निर्णय मंडळाने घेतला आहे. यामुळे हे एका प्रकारे विद्यार्थी आंदोलनाचे यशच आहे.