पुढील आठवडय़ात मुहूर्त?

वांद्रे पूर्वेकडील बेहरामपाडा येथील चार मजली झोपडय़ा अखेर पुढील आठवडय़ात हटवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. येथील एका चार मजली झोपडीच्या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी घडली होती. त्यामुळे येथील अन्य चार मजली झोपडय़ांचा सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. त्यामुळे येथील तीन ते चार मजली झोपडय़ा जमीनदोस्त करण्याचा निर्णय घेतल्याचे पालिकेने स्पष्ट केले.

पश्चिम रेल्वे मार्गावरील वांद्रे पूर्वेला रेल्वे स्थानक आणि स्कायवॉकला खेटून असलेल्या अनधिकृत झोपडय़ांचा मुद्दा गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असून पाच वर्षांपूर्वी येथे भीषण आग लागल्याने अनेक झोपडय़ा जळून खाक झाल्या होत्या. ही आग इतकी मोठी होती की त्याची झळ रेल्वे स्कायवॉक आणि रेल्वे पादचारी पुलालाही बसली होती. आगीची घटना घडूनही पुन्हा नव्याने येथे तीन ते चार मजली ४०० ते ५०० झोपडय़ा उभ्या राहिल्या आहेत. पालिका प्रशासनाने आजपर्यंत याकडे कानाडोळा केला होता. मात्र गुरूवारी येथेच चार मजली झोपडी कोसळून चार जणांचा करूण अंत झाला. या दुर्घटनेनंतर आता पालिकेने येथील झोपडय़ांवरील वाढीव मजले तोडण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, रेल्वे हद्दीत असलेल्या झोपडय़ांवर कारवाई करण्यासाठी पश्चिम रेल्वेची मदत घेण्यात येणार असल्याचेही पालिकेने स्पष्ट केले. तसेच या कारवाईपूर्वी झोपडीधारकांना नोटीस बजावण्यात आली असून स्वतहून झोपडी रिकामी करण्याचे आदेश देण्यात आल्याचेही समजते. पालिकेच्या एच-पूर्व विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी देखील पुढील आठवडय़ांत झोपडय़ांवर कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, दुर्घटनाग्रस्त झोपडीच्या शेजारील तीन ते चार मजली झोपडय़ा रिकाम्या करण्याची नोटीस पालिकेने बजावली होती. पण त्यातील तीन झोपडीधारक टाळे ठोकून पळून गेले तर एकाने स्वतला झोपडीत कोंडून घेतले होते. अखेर शनिवारी या झोपडय़ांचे टाळे तोडून पालिकेने वाढीव मजले तोडण्याचे काम सुरू केले आहे.