News Flash

मुलींच्या वसतिगृहात प्राध्यापकाचा बेकायदा प्रवेश

नियमानुसार, मुलींच्या वसतिगृहात परवानगीशिवाय कोणत्याही पुरुषाला प्रवेशास मनाई आहे.

व्हीजेटीआयमधील तक्रारदार रेक्टर प्राध्यापिकेचीच उलटतपासणी 

वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्थेच्या (व्हीजेटीआय) मुलींच्या वसतिगृहात संस्थेतील एका प्राध्यापकांनी रात्रीच्या वेळेस विनापरवानगी प्रवेश केल्याची लेखी तक्रार वसतिगृहाच्या रेक्टर प्राध्यापिकेने संस्थेच्या वसतिगृह देखरेख समिती व व्यवस्थापन मंडळाकडे केली आहे. कोणत्याही पुरुषाला मुलींच्या वसतिगृहात विनापरवानगी प्रवेशाची मुभा नसताना घडलेल्या या प्रकारामध्ये दोषी प्राध्यापकाची चौकशी करण्याऐवजी मंडळाकडून रेक्टर प्राध्यापिकेचीच उलटतपासणी केली जात असल्याने या प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे.

संस्थेचे माजी प्रधान रेक्टर व इलेक्ट्रिकल विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉ. आर. डी. दारूवाला यांनी ६ सप्टेंबर रोजी संध्याकाळी वसतिगृहातील मुलींची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला मुली अनुपस्थित राहिल्याने याचा जाब विचारण्यासाठी प्रा. डॉ. दारूवाला यांनी रात्री साडेआठच्या सुमारास सरळ वसतिगृहात प्रवेश केला. रेक्टर प्राध्यापिका वसतिगृहात हजर असताना त्यांना यासंबधी कोणतीही पूर्वसूचना त्यांनी दिली नव्हती. नियमानुसार, मुलींच्या वसतिगृहात परवानगीशिवाय कोणत्याही पुरुषाला प्रवेशास मनाई आहे. परंतु नियम डावलून प्रा. डॉ. दारूवाला यांनी वसतिगृहाच्या पहिल्या मजल्यावर जाऊन मुलींना बैठकीला गैरहजर राहण्यावरून फैलावर घेतले. प्रा. डॉ. दारूवाला यांनी अचानक केलेल्या प्रवेशामुळे या मुली गोंधळून गेल्या, असे रेक्टर प्राध्यापिका यांनी संस्थेच्या वसतिगृह समितीकडे केलेल्या तक्रारींमध्ये नमूद केले आहे.

सदर प्रकार घडल्यानंतर रेक्टर प्राध्यापिकेने प्रा. डॉ. दारूवाला यांना यासंदर्भात विचारणा केली असता इलेक्ट्रिकल विभागाचे प्रमुख म्हणून महाविद्यालयातील कोणत्याही ठिकाणी जाताना परवानगी घेण्याची आवश्यकता नाही, असे त्यांनी सांगितले. प्रा. डॉ. दारूवाला यांनी याआधीही मुलीच्या वसतिगृहात बेकायदा प्रवेश केला आहे. वसतिगृहाशी कोणत्याही स्वरूपाचा संबंध नसताना ते वसतिगृहाची प्रवेश प्रक्रिया आणि अन्य कामकाजामध्येही अनेकवेळा हस्तक्षेप करत असतात, असा आरोप ही रेक्टर प्राध्यापिकांनी केला आहे.

वसतिगृह देखरेख समिती व व्यवस्थापन मंडळाने यासंदर्भातील तक्रार महाविद्यालयाच्या महिला कक्षाकडे नोंदविण्याची सूचना केली होती. त्यानुसार, रेक्टर प्राध्यापिकाने महिला कक्षाकडे तक्रारदेखील नोंदविली आहे. परंतु या तक्रारीच्या अनुषंगाने प्रा. डॉ. दारूवाला यांची चौकशी करण्याऐवजी रेक्टर प्राध्यापिकेचीच उलटतपासणी केली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. सदरप्रकरणी प्रा. डॉ. दारूवाला यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बोलण्यास नकार दिला आहे. यासंदर्भात व्हीजेटीआयचे संचालक धीरेन पटेल यांच्याशी अनेकदा प्रयत्न करूनही संपर्क होऊ शकलेला नाही.

सरकारकडून चौकशीचे आदेश

वसतीगृहात घडलेल्या या प्रकाराची तक्रार संस्थेतील कर्मचाऱ्यांनी उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांच्याकडेही केली आहे. वायकर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून आपल्या कार्यालयाच्या देखरेखीखाली चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2017 12:16 am

Web Title: illegal entry of professor in vjti college girls hostel
Next Stories
1 मुंबईसह राज्यात मुसळधार पाऊस; मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम
2 सफाई कामगारांच्या घरांचा प्रश्न अधांतरीच
3 उपनगरवासीयांचा प्रवास सुकर
Just Now!
X