मिठी नदी पात्रातील क्रांती नगर, संदेश नगर येथील बाधित झोपडपट्टीधारकांचे त्वरित स्थलांतर करावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

विमानतळ प्राधिकरणाच्या जागेवरील झोपडपट्टय़ांचे स्थलांतर करण्याबाबत बैठकीचे आयोजन वर्षां या शासकीय निवासस्थानी करण्यात आले. या बैठकीस नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, खासदार विनायक राऊत, आमदार अशोक लांडे आदी उपस्थित होते.

१९९५ च्या कायद्यानुसार जे झोपडपट्टीधारक अपात्र होते त्यांना नियमानुसार २०११ च्या शासन निर्णयाप्रमाणे पात्र करून घेण्याची कार्यवाही करण्यात यावी. झोपडपट्टीधारकांना स्थलांतरित करण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम तयार करून येथील कामांना गती देण्यात यावी. कुर्ला येथील बांधकाम मोकळ्या जागेमध्ये असून या ठिकाणी १७ हजार २०० घरे आहेत. यापैकी काही घरे मोडकळीस किंवा जीर्ण झाली आहेत. तसेच मिठी नदी पात्रात काही घरे आहेत त्यांना प्राधान्य देऊन त्यांचे स्थलांतर करून इतर ठिकाणी त्यांना घरे बांधून देण्यात यावी, असे निर्देशही मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले.