राज्यातील ४८ हजार संशयित अ-बाधित; मुंबईत रुग्णसंख्या निम्म्यावर

करोना साथरोगाचे आक्रमण परतवून लावण्यासाठी राज्य सरकार आणि सरकारच्या यंत्रणांनी आक्रमकपणे के लेल्या लढाईला यश येऊ लागले आहे. मुंबईसह राज्यातील रुग्णसंख्येत घट दिसून येत असून पूर्ण बरे होऊन घरी परतणाऱ्यांची संख्या वाढत आहे.

करोनाचे वादळ घोंगावायला लागले, त्याच वेळी राज्य सरकारने त्याविरोधात तटबंदी उभी करण्यास सुरुवात केली. त्याचाच एक भाग म्हणून गेल्या दीड महिन्यांत करोना चाचणीसाठी ५२ हजार जणांचे नमुने पाठविण्यात आले होते, त्यातील ४८ हजार १९८ संशयित अ-बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. ३०० रुग्ण करोनावर मात करून सुखरूप आपल्या घरी पोहोचले असून, साऱ्या देशाचे लक्ष लागलेल्या मुंबईतील करोनामुक्त झालेल्या १६६ व्यक्तींचा त्यात समावेश आहे.

उर्वरित २९१६ जणांचे चाचणी अहवाल सकारात्मक आले आहेत. त्यापैकी सुमारे ६० ते ७० टक्के व्यक्तींना लक्षणे दिसत नसून २५ टक्के जणांना सौम्य स्वरूपाची लक्षणे आहेत, तर पाच टक्क्यांपेक्षाही कमी रुग्णांची स्थिती गंभीर आहे, अशी माहिती राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात आणि मुंबईत करोनाबाधितांचा आलेख चढता असल्याने चिंता वाढत असली तरी बाधित रुग्ण बरे होऊन त्यांना घरी सोडण्याचे प्रमाणही वाढत आहे.  आरोग्य यंत्रणेच्या परिश्रमामुळे हे शक्य झाल्याचे टोपे म्हणाले.

मुंबईत बाधितांमध्ये मोठी घट

मुंबईत गेल्या आठवडय़ात दरदिवशी आढळणाऱ्या रुग्णांची संख्या २५० वर पोहोचली होती. मृतांचे प्रमाणही २० पर्यंत गेले होते. मात्र गेल्या दोन दिवसांपासून रुग्णांच्या आणि मृतांच्या संख्येतही मोठय़ा प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे संसर्ग प्रसार कमी झाला आहे का अशी चर्चा सुरू झाली आहे. गुरुवारी मुंबईत करोनाचे १०७ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे रुग्णांचा आकडा २०४३ झाला आहे. तर गेल्या चोवीस तासांत ३ जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा ११६ वर गेला आहे.

देशात ३२५ जिल्हे करोनामुक्त

’देशातील ३२५ जिल्हे करोनामुक्त असून माहे, पटणा, नाडिया, प्रतापगड, पोरबंदर, दक्षिण गोवा, पौडी गढवाल, पिलभित, राजौरी, विलासपूर दुर्ग, राजनंदगांव या जिल्ह्य़ांमध्ये २८ दिवसांमध्ये एकही रुग्ण नाही.

’देशभरात १७० हॉस्पॉट जिल्हे असून २०७ संभाव्य हॉटस्पॉट जिल्हे आहेत. करोना रुग्णांची एकूण संख्या १२,३८० झाली असून १४८९ रुग्ण बरे झाले आहेत आणि ४१४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

’करोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण ३.३ टक्के आहे, तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण १२.०२ टक्के आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये ९४१ रुग्णांची भर पडली असून ३७ रुग्णांचा मृत्यू झाला, तर १८३ रुग्ण आजारातून बरे झाले, अशी माहिती केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अगरवाल यांनी गुरुवारी दिली.