सोशल मीडियावर सेल्फी अपलोड करणे एका तरुणाला चांगलेच महाग पडले आहे. या तरुणाचा सेल्फी आवडल्याने आरोपींनी हॉटेलबाहेरुन त्याचे अपहरण करुन त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले. रविवारी आठ डिसेंबर रोजी मुंबईत ही धक्कादायक घटना घडली. बहुतांश गुन्ह्यांमध्ये आरोपी आधी ऑनलाइन फ्रेंडशिप करुन ओळख वाढवतात. समोरच्याचा विश्वास संपादन केला की, नंतर गुन्हा करतात. या प्रकरणात प्रथमच सेल्फीपाहून आरोपींनी गुन्हा केला. मुंबई मिररने हे वृत्त दिले आहे.

चार पैकी एक आरोपी अल्पवयीन आहे. या प्रकरणात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. चौघांविरोधात पोलिसांनी कलम ३७७ (अनैसर्गिक शरीरसंबंध), ३९२(दरोडा) आणि कलम ३४ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. अल्पवयीन आरोपीला बालसुधारगृहात पाठवले आहे.

नेमकं काय घडलं

पीडित तरुणाने रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास हॉटेलबाहेर सेल्फी काढला व त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा फोटो पोस्ट केला. तरुणाने सेल्फी कुठे काढला त्याची सुद्धा माहिती दिली होती. याच माहितीवरुन आरोपी तरुणापर्यंत पोहोचले. आरोपी तिथे आल्यानंतर त्यांनी सेल्फी आवडला असे सांगून पीडित तरुणाचे कौतुक सुरु केले.त्यानंतर तिघे बाईकवरुन फेरफटका मारण्यासाठी म्हणून गेले. एअरपोर्ट जवळच्या एका हॉटेलबाहेर त्यांनी बाईक थांबवली. पीडित तरुणाला त्यांनी जबरदस्तीने कारमध्ये बसवले. गाडीत तिघांनी त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला.

त्यानंतर तासाभराने अल्पवयीन आरोपी तिथे आला. चौघांनी आपल्याला कारमध्ये मारहाण केली असे त्याने एफआयआरमध्ये म्हटले आहे. जवळपास तीन तास या तरुणावर लैंगिक अत्याचार सुरु असताना गाडी वेगवेगळया भागांमध्ये फिरत होती.

अखेर रात्री दीडच्या सुमारास कुर्ल्याच्या दिशेने जाणाऱ्या रोडवर त्यांनी या तरुणाला फेकून दिले. या तरुणाने सर्व घडलेला प्रकार आपल्या पालकांना सांगितल्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार नोंदवली. आरोपी श्रीमंत कुटुंबामधील असून त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.