कुठल्याही निवडणुकीत महिलांची मते निर्णायक असतात. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्ष महिलांची जास्तीत जास्त मते मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. महाराष्ट्रात होत असलेली विधानसभा निवडणुकही याला अपवाद नाही. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पुरुषांच्या बरोबरीने महिलांच्या मतांमुळे सुद्धा राजकीय चित्र बदलू शकते. मुंबईत महिला मतदारांची संख्या लक्षणीय असली तरी प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेतील त्यांचा सहभाग खूपच कमी आहे.

मुंबईत विधानसभेच्या ३६ जागांसाठी एकूण ३३४ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात महिला उमेदवारांची संख्या फक्त ३१ आहे. हे प्रमाण ९.३ टक्के आहे. ३६ पैकी २१ मतदारसंघातून महिला उमेदवार निवडणूक लढवत आहेत. भाजपा आणि काँग्रेस या दोन प्रमुख पक्षांनी मुंबईत फक्त तीन महिलांना उमेदवारी दिली आहे. युतीमुळे भाजपाच्या वाटयाला १७ जागा आल्या असून त्यांनी मनिषा चौधरी, भारती लव्हेकर आणि विद्या ठाकूर या तीन विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. मनिषा चौधरी दहीसर, भारती लव्हेकर वर्सोवा आणि विद्या ठाकूर गोरेगावमधून निवडणूक लढवत आहेत.

मुंबईत काँग्रेस २९ जागा लढवत असून त्यांनी फक्त तीन जागांवर महिलांना उमेदवारी दिली आहे. धारावीमधून विद्यमान आमदार वर्षा गायकवाड, घाटकोपर पूर्वेमधून मनिषा सुर्यवंशी आणि कादीवली पूर्वेमधून डॉ. अजंता यादव यांना उमेदवारी दिलीय. शिवेसना १९ जागा लढवत असून त्यांनी फक्त यामिनी जाधव यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहा जागा लढवत असून त्यांनी दिंडोशीमधून विद्या चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे.

११ अपक्ष महिला उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. धारावीमधून सर्वाधिक महिला उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. ११ पैकी तिथे तीन उमेदवार महिला आहेत. काँग्रेसच्या वर्षा गायकवाड, बसपाच्या अनिता गौतम आणि बबिता शिंदे अपक्ष म्हणून धारावीतून निवडणूक लढवत आहेत. मुंबईत महिलांनी निवडणूक जिंकण्याचे प्रमाण कमी होते.
८० च्या दशकात समाजवादी चळवळीचा जोर असताना महिलांच्या निवडून येण्याचे प्रमाण जास्त होते. १९८५ साली मुंबईत सहा महिला उमेदवार निवडून आल्या होत्या. त्यानंतर महिला आमदारांची संख्या घटत गेली. १९९० साली मुंबईतून एकही महिला उमेदवार विधानसभेत पोहोचू शकली नाही. २०१४ साली भाजपाची लाट असताना मुंबईतून चार महिला आमदार निवडून आल्या.