माहुलमधील घरांची परस्पर विक्री

शहरातील विविध प्रकल्प उभारणीदरम्यान बाधित होणाऱ्यांचे पुनर्वसन करण्यात आलेल्या माहुल गाव येथील वसाहतीमधील दोनशेहून अधिक घरांची दलालांमार्फत परस्पर विक्री करण्यात आल्याच्या प्रकरणी आता कारवाई सुरू झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या दलालाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ‘एम’ पश्चिम विभागातील कर संकलक अधिकाऱ्याला अटक करण्यात आली असून येत्या काही दिवसांत आणखी अधिकाऱ्यांना अटक होण्याची शक्यता आहे.

फसवणूक झालेल्यांनी तक्रार करण्यास सुरुवात केल्यानंतर सुमारे आठ महिन्यांपूर्वी हा घोटाळा उघडकीस आला. मात्र तपासाचे गाडे जागीच रुतलेले होते. ‘लोकसत्ता’ने या घोटाळ्याचा वारंवार पाठपुरावा केल्यानंतर पोलिस कामाला लागले. महिनाभरापूर्वी या प्रकरणात पोलिसांनी एकाला अटक केली. त्याच्या चौकशीत पालिका अधिकारीही या घोटाळ्यास सामील असल्याचे समोर आले असून पालिकेच्या ‘एम’ पश्चिम विभागाचे कार्यालय रडारवर आहे.

बारा वर्षांपूर्वी एमएमआरडीएने माहुल परिसरात शहरातील प्रकल्पग्रस्तांसाठी बारा हजार घरे बांधली होती. त्यानंतर ही सर्व घरे एमएमआरडीएने पालिकेच्या ताब्यात देण्यात आली. सध्या यातील सात हजार घरांमध्ये शहरातील नाले, रस्ते, रेल्वे आणि इतर प्रकल्पांमध्ये बाधित झालेले झोपडीधारक राहत आहेत. तर रिकाम्या घरांचे कुलूप तोडून गेल्या तीन वर्षांत काही माफियांनी यातील दोनशे पेक्षा अधिक घरांची परस्पर विक्री केली आहे. हा सर्व घोटाळा पालिकेच्या एम पश्चिम विभागातील काही अधिकाऱ्यांच्या सहमतीने झाला होता. सात ते आठ लाखांत चेंबूरमध्ये घर मिळत असल्याने अनेक गरीब लोकांनी कर्जबाजारी होऊन या ठिकाणी आपल्या घरांचे स्वप्न पूर्ण केले. मात्र ते अल्पजीवी ठरले. पालिकेच्या मुख्य कार्यालयाला या घोटाळ्याची माहिती मिळताच त्यांनी अनधिकृत वास्तव्य करणाऱ्यांना आठ महिन्यांपूर्वी बाहेर काढले.

फसवणूक झाल्याने अनेक कुटुंबे रस्त्यावर आली. ज्या पालिका अधिकाऱ्यांनी या घरांची खोटी कागदपत्रे बनवून दिली, त्यांनी नंतर हात वर केल्याने या पीडितांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र तक्रार दाखल होऊनही पोलीस आरोपींना अटक करत नव्हते. ‘लोकसत्ता’ने या घोटाळ्याचा सातत्याने वृत्त देऊन पाठपुरावा केला. अखेर महिनाभरापूर्वी पोलिसांनी यातील सुरेशकुमार दास या माफियाला ताब्यात घेत त्याला अटक केली. त्याच्या चौकशीत काही पालिका अधिकाऱ्यांची नावे समोर आल्यानंतर आरसीएफ पोलिसांनी पालिकेच्या एम पश्चिम प्रभागात  कर संकलक या पदावर काम करणाऱ्या सचिन म्हस्के या अधिकाऱ्याला  बुधवारी अटक केली. म्हस्के याला गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला तपासाकरिता न्यायालयाने सोमवापर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यात कोटय़वधी रुपयांचा घोटाळा झाला असून एम पश्चिम वॉर्डातील आणखी चार ते पाच अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचा संशय आहे.