मुंबई : अकरावी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेची दुसरी प्रवेश यादी शनिवारी जाहीर झाली असून दुसऱ्या फेरीत ६० हजार ३७ विद्यार्थ्यांना पसंतीक्रमानुसार महाविद्यालय मिळाले आहे. मात्र, दुसऱ्या फेरीनंतरही केंद्रीय प्रवेश फेरीसाठी ७३ हजारांहून अधिक विद्यार्थी प्रतीक्षेत आहेत.

केंद्रीय प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीसाठी १ लाख ३९ हजार ७९४ जागा उपलब्ध होत्या. त्यासाठी आलेल्या १ लाख ३३ हजार ७२३ अर्जांपैकी ६० हजार ३७ विद्यार्थ्यांना महाविद्यालय देण्यात आले. त्यापैकी १३ हजार २८२ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाचे कनिष्ठ महाविद्यालय मिळाले आहे, तर ११ हजार ७५ विद्यार्थ्यांना दुसऱ्या आणि ८ हजार ३९८ विद्यार्थ्यांना तिसऱ्या पसंतीक्रमाचे कनिष्ठ महाविद्यालय मिळाले आहे. पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे बंधनकारक आहे. दुसऱ्या पसंतीक्रमापासून खालील पसंतीक्रमाची महाविद्यालये मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश हवा असल्यास विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रक्रियेद्वारे संबंधित वेळापत्रकानुसार प्रवेश निश्चित करायचा आहे.