अपुरा साठा असल्याने अनेक जण लस न घेताच माघारी

मुंबई : मुंबईत गुरुवारी लसीकरण बंद ठेवल्यानंतर शुक्रवारीही अपुऱ्या लससाठय़ामुळे केंद्रांवर गोंधळाचे वातावरण होते. प्रत्येक केंद्रावर दुपारनंतर १०० ते २०० मात्राच उपलब्ध झाल्याने शेकडो नागरिकांना लस न घेताच परतावे लागले.

पालिकेकडील लशीचा साठा पूर्ण संपल्यामुळे मुंबईत गुरुवारी लसीकरण बंद ठेवले होते. शुक्रवारी लस उपलब्ध होईल आणि लसीकरण सुरळीत होईल असे वाटत असताना सकाळच्या सत्रात लसीकरण होऊ शकले नाही. लस घेण्यासाठी अनेक केंद्रांवर नागरिकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. परंतु लससाठाच नसल्याने केंद्रांनी लसीकरण सुरू केले नाही. शुक्रवारी सकाळी पालिकेला सुमारे सव्वा लाख लशींचा साठा मिळाला. त्यानंतर दुपारी दोन वाजता केंद्रावर लसीकरण सुरू झाले. मात्र, त्यानंतरही अनेकांना लस मिळू शकली नाही. काही नागरिक ताटकळत थांबले, तर काही जण वाट बघून घरी परतले, अशी माहिती दादरमधील लसीकरण केंद्रातील डॉक्टरांनी दिली.

वरळीतील पोदार रुग्णालयातील केंद्रामध्ये शुक्रवारी २०० लशींचा साठा मिळाला होता. त्यातील १०० पूर्वनोंदणीशिवाय तर १०० पूर्वनोंदणी न केलेल्यांसाठी होता. परंतु नागरिकांची गर्दी मोठय़ा प्रमाणात असल्याने २०० जणांना केंद्रात प्रवेश दिला तर उर्वरित नागरिकांना परत पाठवावे लागले, असे केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी सांगितले.

नागरिक, कर्मचारी वाद

पालिकेला शुक्रवारी साठा उशिरा मिळाल्याने दुपारी दोननंतर सुरू झालेले लसीकरण पाचपर्यंत होते. तीन तासच लसीकरण सुरू असल्यामुळे संतप्त झालेले नागरिक आणि कर्मचारी यांच्यात केंद्रावर वाद झाले, अशी माहिती कांदिवलीच्या लसीकरण केंद्रातील कर्मचाऱ्यांनी दिली.

कमी मात्रांचे वाटप 

पालिकेची दिवसाला  एक लाख लसीकरणाची क्षमता आहे. परंतु साठाच सव्वा लाख  मात्रांचा आला. त्यात प्रत्येक केंद्रावर लस उपलब्ध करणेही गरजेचे असल्याने १०० ते २०० मात्रांचे वाटप केले गेले, असे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.