07 March 2021

News Flash

ग्रामीण भागात करोना रुग्णांमध्ये वाढ

चंद्रपूर, यवतमाळ व धुळे जिल्ह्य़ातही करोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

संदीप आचार्य

राज्याच्या दृष्टीने चिंताजनक गोष्ट म्हणजे शहरी भागापुरता मर्यादित असलेला करोना आता ग्रामीण भागातही झपाटय़ाने पसरू लागला आहे. कोल्हापूर, सोलापूर, जळगाव, अहमदनगर, लातूर, उस्मानाबाद व अमरावती जिल्ह्य़ात करोना रुग्णांची संख्या वेगाने वाढू लागली आहे. त्याचबरोबर चंद्रपूर, यवतमाळ व धुळे जिल्ह्य़ातही करोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत.

गेल्या आठवडाभरात राज्यात रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असून गेल्या आठवडय़ाच्या सुरुवातीला सुमारे १४ हजार असलेली करोना रुग्णांची संख्या रविवारी १६ हजारांवर पोहोचली आहे. मुंबईतील करोनाची परिस्थिती नियंत्रणात असून करोनाची दुसरी लाट आली तरी त्याचा सामना करण्यासाठी आम्ही सज्ज असल्याचे मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. पुण्यात रुग्णांची वाढती संख्या आणि रुग्णालयीन व्यवस्थापन यांचे प्रमाण व्यस्त आहे.

पुणे मंडळात सर्वाधिक रुग्ण

रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करावयाच्या रुग्णांचा विचार केला तरी राज्यात सर्वाधिक रुग्ण पुणे मंडळात असून ही संख्या ४९ हजार ६६५ एवढी आहे. मुंबईत आजघडीला १९ हजार ९७१ तर ठाणे २० हजार २६४, रायगड ५३३६, कोल्हापूर ६११९, सोलापूर ४३६३, नाशिक १० हजार २९८, नागपूर ११ हजार ४३४ तर औरंगाबाद येथे ५८१३ रुग्ण उपचार घेत आहेत. याशिवाय चंद्रपूर, यवतमाळ, बुलढाणा व धुळे येथे दोन हजार ते साडेतीन हजार करोनाबाधित उपचारांअंतर्गत असल्याचे आरोग्य विभागाच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. ग्रामीण भागात करोना रुग्ण वाढत असून संपूर्ण  यंत्रणा करोनाच्या लढाईत उतरल्यामुळे लसीकरणापासून ते राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांतर्गत येणाऱ्या वेगवेगळ्या आरोग्य उपक्रमांवर त्याचा परिणाम होत असल्याचे अधिकारी मान्य करतात.

लसीकरण, मोतिबिंदू शस्त्रक्रिया, नसबंदी कार्यक्रम या सर्वावर करोनाचा परिणाम झाला असून करोनाबरोबरच पावसाळी आजाराचा सामना करणे हे आव्हान आरोग्य विभागासमोर असल्याचे सहसंचालक डॉ. सतीश पवार यांनी सांगितले. यासाठी करोना रुग्ण शोधण्याबरोबर त्यांच्या संपर्कातील लोकांना शोधण्याचे काम  करण्यात येत असून संस्थात्मक तसेच घरी विलगीकरणावर भर देण्यात आला आहे.

ग्रामीण भागातील करोना रुग्णांची संख्या लक्षात घेऊन काळजी घेण्यात येत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, जिल्हा रुग्णालयांमधील डॉक्टरांना  प्रशिक्षण देण्यात आले असून औषधांची कोणतीही कमतरता राहाणार नाही, याचीही खबरदारी घेतली आहे.

-डॉ.साधना तायडे, आरोग्य संचालक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 31, 2020 12:22 am

Web Title: increase in corona patients in rural areas abn 97
टॅग : Coronavirus
Next Stories
1 जेमतेम १९ टक्के विद्यार्थ्यांची पहिली पसंती फळाला
2 परीक्षा बहुपर्यायी, तासाभराची!
3 ई-पासमुक्तीची आज घोषणा
Just Now!
X