राज्यातील राजकीय परिस्थितीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात सोमवारी सविस्तर चर्चा झाली.

केंद्र सरकारचा राज्याच्या कारभारातील वाढता हस्तक्षेप यासह विविध विषयांवर उभयतांमध्ये चर्चा झाली. भाजपच्या वाढत्या हस्तक्षेपाला कशा पद्धतीने प्रत्युत्तर द्यायचे यावर खल झाल्याचे समजते. राज्यातील भाजप नेत्यांच्या सध्या चौकशा सुरू आहेत. या पूर्ण करून भाजप नेत्यांना अडचणीत आणण्याची मागणी आघाडीच्या नेत्यांकडून केली जाते.

राज्यपालांच्या कार्यक्रमाला अनुपस्थिती

ग्राहक दिनानिमित्त राज्य ग्राहक न्यायालयाच्या वतीने वेबिनारच्या माध्यमातून चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि शरद पवार हे सहभागी होणार होते. परंतु पवार हे सहभागी झाले नाहीत. ‘असे राज्यपाल राज्याने कधी बघितले नाहीत, अशी टीका पवार यांनी केली होती.