मुंबई : संगीत हाच श्वास आणि हाच धर्म मानून श्रद्धेने त्याची साधना करणाऱ्या आणि सुरांचेही विज्ञान रसिकांपर्यंत अभ्यासू वृत्तीने पोहोचवणाऱ्या स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांच्याशी संवाद साधण्याची अनोखी संधी ‘लोकसत्ता गप्पां’च्या मैफिलीतून रसिकांना लाभणार आहे.

शास्त्रीय गायकीवरची मातब्बरी ही अवघड साधनाच. ती तितक्याच तन्मयतेने साध्य करणाऱ्या प्रभा अत्रे यांचा परीघ मात्र मैफलीतील गायकीपुरताच मर्यादित राहिला नाही. प्रयोगशील वृत्तीमुळे त्यांची संगीतसाधना अधिक अर्थपूर्ण झालीच, पण संगीत रचनाकार, लेखिका आणि संगीताचा वारसा पुढील पिढीपर्यंत नेणाऱ्या गुरू म्हणूनही त्यांचे कार्य मोठे आहे. निष्ठा, सातत्य, जिद्द, कलेवरचे आत्यंतिक प्रेम आणि श्रद्धा यांच्या मिलापातून घडलेला किराणा घराण्याच्या गायिकेचा हा प्रवास या गप्पांच्या माध्यमातून त्यांच्याचकडून जाणून घेता येणार आहे.

वयाच्या आठव्या वर्षी सुरू झालेली डॉ. प्रभा अत्रे यांची संगीतसाधना आजही अव्याहत सुरू आहे. गानहिरा हिराबाई बडोदेकर यांच्याकडून संगीताचे धडे त्यांनी घेतले. पंडित सुरेशबाबू माने आणि हिराबाई बडोदेकर यांची शिष्या असलेल्या डॉ. प्रभा अत्रे यांनी स्वत: नवनवीन रागांची रचना केली. संगीताचा हा अभ्यास त्यांनी ‘स्वरमयी’, ‘स्वरांगिणी’ अशा पुस्तकांतून लोकांपर्यंत रसाळ आणि सहज पद्धतीने पोहोचवला. त्यांची ही अफाट संगीतसाधना, त्यांचे अनुभव, त्यांचे विचार केसरी टूर्स सहप्रायोजित या कार्यक्रमातून उलगडणार आहेत.

दैनंदिन वृत्तव्यवहाराच्या पलीकडे जाऊन विचारांच्या नवनव्या दिशांचा शोध घेण्यासाठीचा वाचकस्नेही संवादसेतू असा हा ‘लोकसत्ता गप्पा’ उपक्रम. ख्यातकीर्त साहित्यिक एस. एल. भैरप्पा, ज्येष्ठ गायक-संगीतज्ञ-लेखक पं. सत्यशील देशपांडे, अभिजात संगीतात स्वत:चा ठसा उमटविणारे पं. मुकुल शिवपुत्र, लेखक-शायर जावेद अख्तर, कलावंत नसिरुद्दीन शहा, मनस्वी कवी गुलजार, चित्रकार सुभाष अवचट ते रंगभूमी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या दिग्दर्शनाची मोहोर उमटवणाऱ्या सई परांजपे अशा मातब्बर अवलियांनी या उपक्रमाला वेगळ्या उंचीवर नेले. ‘लोकसत्ता गप्पां’च्या या नव्या पर्वात डॉ. प्रभा अत्रे यांच्याशी संवाद साधण्याची संधी निमंत्रित वाचकांना मिळणार आहे.