सरसंघचालक मोहन भागवत यांचे प्रतिपादन

आर्थिक विकासासाठी कोणत्याही विशिष्ट अशा चौकटबंद आर्थिक तत्त्वप्रणालीत अडकणे भारताच्या हिताचे ठरणार नाही. तर नीतिमत्तेवर आधारित असा, जमीन, जंगल, पाणी ही नैसर्गिक संपत्ती वाढवणारा आणि लोकांच्या हाताला रोजगार देणारा असा भारतीय विचाराचा आर्थिक विकासाचा आराखडा तयार करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सोमवारी मुंबई शेअर बाजारातील कार्यक्रमात केले.

‘सोशियो-इकॉनॉमिक डायनॅमिक्स ऑफ इंडियन सोसायटी : अ हिस्टॉरिकल ओव्हरव्ह्य़ू’ या पुस्तकाचे प्रकाशन मुंबई शेअर बाजाराच्या सभागृहात भागवत यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. विवेक समूह, मुंबई शेअर बाजार व पुण्यातील गोखले अर्थशास्त्र संस्था यांच्यातर्फे या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले असून अर्थतज्ज्ञ अभय टिळक यांनी त्याचे संपादन केले आहे. नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार, मुंबई शेअर बाजाराचे अध्यक्ष एस. रवी, आशीषकुमार चौहान, संजय पानसे, विवेक समूहाचे दिलीप करंबेळकर आदी या वेळी उपस्थित होते.

कोणतीही व्यवस्था शाश्वत नसते. तीच गोष्ट तत्त्वप्रणाली-विचारसरणी म्हणजेच ‘इझम’लाही लागू पडते. कारण ती एक बंदिस्त-साचेबद्ध विचारसरणी असते. त्यामुळेच आपल्यालाही साचेबद्ध विचारसरणीच्या दलदलीतून बाहेर पडून वस्तुस्थितीचा विचार करावा लागेल. आपला इतिहास, स्वत्व विसरून प्रगती साधता येणार नाही. विकासाचे मापदंड आपले हवेत. भारतीय संस्कृती संतुलन शिकवते. सर्वाना सोबत घेऊन जाणारा विकास आपल्याला साध्य करावा लागेल. त्यामुळेच जगात जे चांगले आहे ते घेऊन नीतिमत्तेवर आधारित असा भारतीय पद्धतीचा आर्थिक विकासाचा आराखडा आपल्याला तयार करावा लागेल, असे भागवत यांनी नमूद केले.

या आराखडय़ात अर्थाचे केंद्रीकरण नाही तर विकेंद्रीकरण होईल. जमीन, जंगल, पाणी या नैसर्गिक संपत्तीचा नाश करणारा नव्हे तर त्यांची श्रीमंती वाढवणारा तो विकास असेल. आपली लोकसंख्या प्रचंड आहे. त्यामुळे बेरोजगारी वाढली तर असंतोष निर्माण होईल हे लक्षात घेऊन रोजगार वाढवणारे उद्योग हवेत. ऊर्जेचा भरमसाट नव्हे आवश्यक तितकाच वापर करावा लागेल अशा तंत्रज्ञानाचा विकासासाठी वापर व्हावा, महागाई नियंत्रणात ठेवणारी व्यवस्था हवी, आयात कमी तर निर्यात जास्त हवी आणि त्याचबरोबर उद्योग-व्यापार-कृषी यांचा समन्वय या आर्थिक विकासाच्या आराखडय़ात असावा, असे भागवत यांनी स्पष्ट केले. अशारीतीने आर्थिक विकास साधत भारताने जगाला मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षाही भागवत यांनी व्यक्त केली.

आपल्या आकाशावर आपलेच प्रभुत्व हवे!

एअर इंडियाचा तोटा वाढल्याने ती विकण्याच्या चर्चा सुरू असल्याबाबतही भागवत यांनी भाष्य केले. हजारो कुशल व अनुभवी कर्मचारी, विमाने, विमान उड्डाणाचे अधिकार अशा अनेक समृद्ध गोष्टींमुळे एअर इंडियाचे मोल खूप आहे. ही कंपनी तोटय़ात आहे कारण ती नीट चालवली जात नाही. त्यामुळे ती नीट चालवणाऱ्यांकडे सोपवा. आपल्या आकाशावर आपलेच प्रभुत्व हवे. ते बाहेरच्या लोकांना सोपवून चालणार नाही, असे भागवत यांनी नमूद केले.

‘कॅशलेस’वरून मोदी यांना टोला

संतुलन हा भारतीय संस्कृतीचा गाभा आहे असे सांगताना मोहन भागवत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कॅशलेस अर्थव्यवस्थेच्या आग्रहावर निशाणा साधला. भारत प्रचंड मोठा देश आहे. सर्व थरांतील लोक राहतात. त्यामुळे संपूर्ण कॅशलेस अर्थव्यवस्था असूच शकत नाही. फार तर लेस कॅश असे करता येईल. कोणताही देश कितीही प्रगत झाला तरी अर्थव्यवस्थेत काही प्रमाणात तरी चलन ठेवावेच लागेल, असा टोला भागवत यांनी लगावला.