ieMalayalam आणि ieTamil च्या यशस्वी लाँचिंगनंतर इंडियन एक्स्प्रेस समूहाने आता प्रादेशिक भाषेत आणखी एक पाऊल टाकले आहे. वर्ष २०१७ मध्ये या वेबसाइट लाँच करण्यात आल्या होत्या. एक्स्प्रेस समूहाने आता ieBangla.com वेबसाइटद्वारे बंगाली भाषेत पर्दापण केले आहे. पोइला बैसाख म्हणजे बंगाली नववर्षाच्या मुहूर्तावर ही वेबसाइट सुरू करण्यात आली आहे. नवीन वेबसाइट ieBangla.com ही वेबसाइट फक्त राजकीय विचारांचे विश्लेषण करणार नाही तर विचारशील बंगाली वाचकांना तंत्रज्ञान, मनोरंजन आणि क्रीडा जगताशी निगडीत वेगळ्या आणि माहितीपूर्ण बातम्या देणार आहे. या वेबसाइटवर असा आशय पाहायला मिळेल जो आतापर्यंत बंगाली भाषेत पाहायला मिळाला नसेल. ही वेबसाइट कोलकाता येथून कार्यरत राहील आणि यामध्ये जगभरातील लेखकांचे योगदान असेल.

ieBangla.com चे डिझाईन अत्यंत सुटसुटीत असेल आणि सुरूवातीला कोणत्याही प्रकारच्या जाहिराती त्यावर नसतील. वेबसाइट लाँचिंग वेळी इंडियन एक्स्प्रेस डिजिटलच्या सीईओ दुर्गा रघुनाथ म्हणाल्या की, बंगाली ही भाषा अशी आहे की, तिचे चाहते केवळ देशातच नव्हे तर संपूर्ण जगभरात आढळून येतात. या भाषेत वेबसाइट लाँच करण्यासाठी आम्ही खूप उत्साहित आहोत. सदैव जागरूक आणि सृजनशील बंगाली समाजाला आधिकाधिक उपयोगी माहिती देण्यासाठी आमचा सदैव प्रयत्न असेल.

द इंडियन एक्स्प्रेस समूह हिंदीबरोबरच प्रादेशिक भाषेतही आपली छाप पाडत आहे. हिंदीमध्ये Jansatta.com आणि मराठीत Loksatta.com वाचकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. गेल्या काही वर्षांत या वेबसाइटच्या वाचकांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. २०१६ मध्ये Inuth.com ही वेबसाइट लाँच करण्यात आली. ‘व्हिडिओ फर्स्ट’ या संकल्पनेवर आधारित ही वेबसाइट खास युवावर्ग डोळ्यासमोर ठेऊन लाँच करण्यात आली आहे.

द इंडियन एक्स्प्रेस समूहाचा देशातील सर्वांत मोठ्या प्रकाशकांमध्ये समावेश होतो. समूहाची मुख्य वेबसाइट indianexpress.com इंग्रजी वृत्तपत्र क्षेत्रातील वेबसाइट Timesofindia.com नंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. समूहाची व्यवसाय जगतातील बातम्यांचे पोर्टल financialexpress.com मोबाइल प्लॅटफॉर्मवर economictimes.com नंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर समूहाचे मराठी वृत्तपत्र दैनिक लोकसत्ताची वेबसाइट Loksatta.com देशातील दुसरे सर्वांत मोठे मराठी पोर्टल आहे.