भारतीय मच्छिमार बोटीवर पाककडून झालेल्या गोळीबारात एका भारतीय मच्छिमाराचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी सकाळी घडलेल्या या घटनेचा तपास मुंबईच्या यलो गेट पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. पोलिसांचे एक पथक पुढील तपासासाठी गुजरातला रवाना झाले आहेत.
गुजरातच्या देवभूमी द्वारका जिल्ह्यातील रहिवाशी असलेला इक्बाल भट्टी (वय४०) प्रेम सागर या बोटीवर मच्छिमारीसाठी गेला होता. त्याच्यासोबत बोटीवर आठजण होते. शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास एका पाकिस्तानी बोटीतून प्रेमसागर बोटीवर गोळीबार करण्यात आला. या पाकच्या बोटीवर २० ते २५ जण होते आणि बोटीवर पाकिस्तानी झेंडा फडकत होता. ही बोटी पाकच्या सागरी सुरक्षा विभाग (पीएमएसए) ची असल्याचे समजते. गोळीबाराची घटना आंतरराष्ट्रीय सागरी सीमा रेषेजवळ घडली. मच्छिमारी करणाऱ्या नौकांनी जर हद्द ओलांडली तर त्यांना उभय देशांकडून अटक केली जाते. परंतु मच्छिमारांवर गोळीबार करण्याची ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे गोळीबार करणारी बोट नेमकी कोणाची हा प्रश्न देखील उपस्थित झाला आहे. गुजरातच्या ओखा पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात पाक व्यक्ती विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या सागरी हद्दीतील गुन्ह्यांचा तपास मुंबईच्या यलो गेट पोलीस ठाण्यात करण्यात येत असल्याने तो यलो गेट पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. नौदल आणि तटरक्षक दलानेही या प्रकरणाचा अहवाल तयार केला आहे. या प्रकरणातील साक्षीदारांचे जबाब नोंदवून पुढील तपास करण्यासाठी यलो गेट पोलीस ठाण्याचे एक पथक गुजरातला रवाना झाले आहे.

यलो गेट सगळ्यात मोठं सागरी पोलीस ठाणे<br />इंग्रजांच्या काळात बांधण्यात आलेल्या यलो गेट या सागरी पोलीस ठाण्याची हद्द कच्छपासून कन्याकुमारी पर्यंतचा सुमारे सोळाशे नॉटीकल मैल सागरी प्रदेश आहे. या भागात कुठलाही गुन्हा घडला की तो या यलो गेट पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात येतो. त्यामुळे गुजराथ मधील मच्छिमाराच्या हत्येचा गुन्हा ओखा पोलीस ठाण्यात नोंदवून तपासासाठी यलो गेट पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. अपुरे पोलीस बळ, साधनसामुग्रीची कमतरता यामुळे एवढय़ा मोठ्या प्रदेशात काम करणं मोठं दिव्य असल्याची खंत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने व्यक्त केली आहे.