29 September 2020

News Flash

अकरावी-बारावीच्या अभ्यासक्रमात ‘संगीतोपचारा’चा समावेश

‘भारतीय संगीत’ विषयाचा अभ्यासक्रमात समावेश

‘भारतीय संगीत’ विषयाचा अभ्यासक्रमात समावेश

अकरावी, बारावीला ‘भारतीय संगीत’ हा विषय शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये संगीतोपचार करण्याची क्षमता वृद्धिंगत होईल,’ असा अजब दावा राज्याच्या शिक्षण विभागाने केला आहे. अद्याप कोणताही शास्त्रीय आधार नसलेल्या संगीतोपचारांचा समावेश विभागाने अभ्यासक्रमातच केल्याचे उघड झाले आहे.

यंदा अकरावी आणि पुढील वर्षी बारावीची पाठय़पुस्तके बदलणार आहेत. शालेय स्तरावर ज्याप्रमाणे प्रत्येक इयत्तेत विद्यार्थ्यांला काय यावे, कोणत्या क्षमतांचा विकास व्हावा यादृष्टीने अध्ययन निष्पत्तीचे निकष जाहीर केले आहेत तसेच अकरावी आणि बारावीसाठीही निकष तयार करण्यात आले आहेत.  क्षमता विधाने म्हणून हा आराखडा शिक्षण विभागाने जाहीर केला आहे. या क्षमता विधानानुसार पाठय़पुस्तके तयार करण्यात येणार आहेत. यातील भारतीय संगीत या विषयात वादग्रस्त असलेल्या संगीतोपचार पद्धतीचा समावेश करण्यात आला आहे. अकरावी, बारावीच्या विद्यार्थ्यांमध्ये संगीतोपचार करण्याची क्षमता वृद्धिंगत व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आली आहे.

संगीताच्या माध्यमातून उपचार होऊ शकतात किंवा संगीत ऐकून रुग्णाला बरे वाटते या मुद्दय़ांवर सातत्याने चर्चा होत असते. मात्र अद्याप संगीतोपचार ही मान्यताप्राप्त उपचार पद्धती नाही. असे असतानाही शिक्षण विभागाने मात्र त्याचा थेट अकरावी, बारावीच्या अभ्यासक्रमात समावेश केला आहे. संगीत कला शिकण्यासाठी अनेक महान कलाकारांनी आयुष्य वेचले असताना बारावीचे विद्यार्थी उपचार करण्याची क्षमता वृद्धिंगत कसे काय करणार, असाही गमतीदार मुद्दा यातून उपस्थित झाला आहे.

संगीतातून आजार बरे होतात असा दावाही शिक्षण विभागाने केला आहे. ‘संगीतातून रोगमुक्ती होऊ शकते याची अनुभूती घेणे’ या मुद्दय़ाचा आराखडय़ात समावेश करण्यात आला आहे. शरीरातील व्याधी, अवयव यांची चिकित्सा आणि संगीत यांचे शिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. दरवर्षी जवळपास ९ ते १० हजार विद्यार्थी ‘भारतीय संगीत’ हा विषय घेऊन बारावीची परीक्षा देतात. गेल्यावर्षी (२०१८) राज्यातील ९ हजार ३२९ विद्यार्थ्यांनी हा विषय घेतला होता. शास्त्रीय संगीत, सुगम संगीत या विषयांची परीक्षाही साधारण ९ हजार विद्यार्थ्यांनी दिली होती. आता राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना मान्यता नसलेल्या उपचार पद्धतीचे शिक्षण देण्याचा दावा विभागा करत आहे.

या वादग्रस्त उपचार पद्धतीबरोबरच इतरही अनेक गंमतीदार वाटावीत, अशी विधाने शिक्षण विभागाने केली आहेत. राष्ट्रभक्तीपर गाणी ऐकून राष्ट्रीय एकात्मतेची भावना वाढीस लागेल, असेही विभागाचे म्हणणे आहे. त्याचबरोबर या आराखडय़ात फक्त कथ्थक या नृत्यप्रकाराचा समावेश करण्यात आला आहे. मात्र दक्षिण भारतातील कोणत्याही नृत्य प्रकाराचा समावेश नाही.

क्षमता विधाने म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये कोणत्या क्षमता विकसित व्हाव्यात त्याची रूपरेषा आहे. ती तज्ज्ञांनी तयार केली आहे. हरकती आणि सूचनांसाठी ती प्रसिद्ध करण्यात आली आहेत. त्याबाबत येणाऱ्या सूचनांनुसार बदल केले जातील. त्यामुळे कोणत्याही मुद्दय़ाबाबत कुणालाही काहीही हरकत असल्यास ती नोंदवण्यात यावी.

– डॉ. सुनील मगर, संचालक, बालभारती

हरकती नोंदवण्याची मुदत १० मे : विभागाने शनिवारी (४ मे) हा आराखडा जाहीर केला. अकरावी, बारावीच्या सर्वच विषयांसाठीची क्षमता विधाने जाहीर करण्यात आली आहेत. त्यावर १० मेपर्यंत हरकती नोंदवण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. दरम्यान हरकती आणि सूचना नोंदवण्यासाठी अवघे पाचच दिवस मिळत असल्याचा आक्षेप शिक्षकांनी घेतला आहे. बालभारतीच्या संकेतस्थळावर हरकती नोंदवता येणार आहेत.

आराखडय़ातील क्षमता विधाने

  • अभिजात संगीताचे अध्ययन करताना विविध आजारांवर संगीतोपचार करण्याची क्षमता वृद्धिंगत करणे
  • संगीतातून रोगमुक्ती होऊ शकते, याची अनुभूती घेणे
  • शरीरातील विविध अवयव, विविध व्याधी आणि संगीत यांचा चिकित्सक पद्धतीने अभ्यास करणे
  • एखाद्या नवीन वाद्याची निर्मिती करण्याचे कौशल्य विकसित करणे
  • विविध जाहिरातींच्या जिंगल्स ऐकून नवनिर्मिती करण्याची क्षमता वृद्धिंगत करणे
  • राष्ट्रभक्तीपर गीतांतून विद्यार्थ्यांत राष्ट्रीय एकात्मतेची भावना वाढील लावणे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 6, 2019 12:54 am

Web Title: indian music now as subject in junior college
Next Stories
1 व्यंगचित्रकारात जुलमी राजवट उलथवण्याची धमक – राज ठाकरे
2 अंधेरीत सिलिंडर स्फोटानंतर इमारतीला आग, आगीवर ताबा मिळवण्याचे प्रयत्न सुरू
3 दुष्काळाकडे सरकारचे दुर्लक्ष -पवार
Just Now!
X