आयएनएस वीर आणि आयएनएस निपात या दोन क्षेपणास्त्रधारी युद्धनौका गुरुवारी सायंकाळी अरबी समुद्रात अस्ताला जाणाऱ्या सूर्याच्या साक्षीने भारतीय नौदलाच्या सेवेतून निवृत्त होत आहेत. या दोन्ही युद्धनौकांनी अनुक्रमे २९ व २८ वर्षे यशस्वी सेवा बजावली आहे.
१९७१च्या युद्धामध्ये आयएनएस वीर आणि निपात या दोन्ही ओएसए वर्गातील युद्धनौकांचा समावेश कराची बंदरावर हल्ला चढविणाऱ्या ताफ्यात होता. त्यावेळेस त्यांची कामगिरी विशेष गाजली होती. नौदलामध्ये एखादी युद्धनौका निवृत्त झाली तरी तिचे नाव कायम राहते आणि नव्या वर्गातील त्याच नावाची युद्धनौका तिची जागा घेते. त्यानुसारच वीर व निपात या दोन युद्धनौकांनी पूर्वीच्या ओएसए वर्गातील युद्धनौकांची जागा अनुक्रमे २६ मार्च १९८७ आणि ६ डिसेंबर १९८८ रोजी घेतली. २२ व्या किलर स्क्वाड्रनमध्ये त्यांचा समावेश होता. या दोन्ही युद्धनौकांवर प्रत्येकी १०० नौसैनिक व अधिकारी कार्यरत होते.