सोयीसुविधांनी युक्त अशा डब्यात सीसीटीव्ही, स्मोक डिटेक्टर यंत्रणा नाही

लांब पल्ल्याचा प्रवास आरामदायी होण्यासाठी पश्चिम रेल्वेने सर्व सुविधांनी युक्त वातानुकूलित ‘अनुभूती’डबा शताब्दी एक्स्प्रेसला जोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विमानसेवेप्रमाणेच रेल्वे प्रवाशांचा प्रवास आरामदायी होणार असल्याचा दावा पश्चिम रेल्वेने केला आहे. हा डबा मुंबई सेन्ट्रल ते अहमदाबाद शताब्दी एक्स्प्रेसला जोडण्यात येणार असून लवकरच तो प्रवाशांच्या सेवेत येईल. महत्त्वाची बाब म्हणजे सुविधा जरी देण्यात आल्या असल्या तरी आधुनिक अशा डब्यात प्रवाशांच्या सुरक्षिततेकडे मात्र दुर्लक्षच झाले आहे. सीसीटीव्ही, स्मोक डिटेक्टरसारख्या सुरक्षा यंत्रणाच डब्यात नसल्याने प्रवाशांची सुरक्षा रामभरोसे आहे.

चेन्नईतील रेल्वेच्या कारखान्यात देशभरात धावणाऱ्या शताब्दी एक्सप्रेससाठी ‘अनुभूती’ डब्यांची बांधणी केली जात आहे. आतापर्यंत रेल्वेच्या देशभरातील विविध विभागांसाठी दहा डबे बांधण्यात आले आहेत. यातील दोन डबे पश्चिम आणि दोन डबे मध्य रेल्वेसाठी आहेत. दोनपैकी पश्चिम रेल्वेवर एक डबा दाखल झाला आहे, तर दुसरा डबा लवकरच दाखल होईल. शताब्दीतील वातानुकूलित प्रथम श्रेणीच्या एक्झिक्युटिव्ह चेअर कारला डबे जोडण्यात येणार आहेत. त्यामुळे पश्चिम रेल्वेवर अशा प्रकारे पहिल्यांदाच सेवा उपलब्ध होणार आहे.

५६ आसन क्षमता असलेल्या अनुभूती डब्यांमध्ये विमानातील आसनांप्रमाणेच आसन व्यवस्था आहे. डब्यातील टू बाय टू आसनांमागे एलईम्डी स्क्रीन, मोबाईल चार्जिग व्यवस्था, हेडफोन, जीपीएसमार्फत दाखविण्यात येणारी प्रत्यक्ष वेळ इत्यादी सुविधा आहेत. एक डबा बनविण्यासाठी २ कोटी ८४ लाख रुपये खर्च आल्याची माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली.

नुकत्याच मुंबई ते गोवा मार्गावर सुरू करण्यात आलेल्या तेजस एक्स्प्रेसच्या डब्यांमध्येही सीसीटीव्ही यंत्रणा आहे. त्यामुळे अनुभूती डब्यात सुरक्षा यंत्रणेकडे दुर्लक्ष का असा सवाल उपस्थित होतो.

तेजस एक्सप्रेस ही पूर्ण ट्रेन असून त्याच्या सर्व डब्यात सीसीटीव्ही आहेत. मात्र सध्या मुंबईत दाखल झालेला हा एकच डबा आहे. सीसीटीव्ही लावण्याचे नियोजनही लवकरच केले जाणार आहे.

रवींद्र भाकर (पश्चिम रेल्वे-मुख्य जनसंपर्क अधिकारी)