मुंबई : केंद्र सरकारच्या ‘स्वच्छता सर्वेक्षणा’त यंदा देशभरातील शहरांमध्ये मध्य प्रदेशातील इंदूरने प्रथम, भोपाळने दुसरा क्रमांक, तर चंदिगडने तृतीय क्रमांक पटकावला आहे. तर राज्यांच्या राजधान्यांच्या श्रेणीमध्ये मुंबईने आघाडीचे स्थान मिळविले आहे. देशभरातील शहरांमध्ये मुंबईला कितवे स्थान मिळाले हे मात्र अद्याप गुलदस्त्यातच आहे.

यंदा ‘स्वच्छ भारत अभियाना’मध्ये राज्यांच्या राजधान्यांच्या श्रेणीचा नव्याने समावेश करण्यात आला. या श्रेणीमध्ये महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळख बनलेल्या मुंबईने प्रथम क्रमांक पटकावला आहे. भारतातील मोठय़ा स्वच्छ शहराचा मान आध्र प्रदेशमधील विजयवाडा शहराला मिळाला आहे. वेगाने प्रगती करणाऱ्या शहरांमध्ये उत्तर प्रदेशमधील गाझियाबादने आघाडी मिळविली आहे. नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद देणाऱ्या शहरांमध्ये राजस्थानमधील कोटा, महाराष्ट्रातील परभणीने, नावीन्यपूर्ण आणि सर्वोत्कृष्ट कृती श्रेणीमध्ये महाराष्ट्रातील नागपूरने आणि गोव्यातील पणजीने, तर सौर ऊर्जा व्यवस्थापन श्रेणीत नवी मुंबई, तिरुपतीने आघाडीचे स्थान पटकावले आहे.

नवी दिल्ली येथे बुधवारी सायंकाळी एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

मुंबईत घरोघरी जाऊन कचरा गोळा करण्यावर भर देण्यात आला असून पूर्वी ३ हजार ३१४ सार्वजनिक ठिकाणी असलेल्या कचरा संकलन केंद्रांची संख्या आता ९४१पर्यंत खाली आली आहे. त्याचबरोबर पालिकेची उद्याने, इमारती, रुग्णालये, कार्यालये इत्यादी १ हजार २६ ठिकाणी ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती करणारे प्रकल्प सुरू करण्यात आले.

मुंबईतील २० हजार चौरस मीटरपेक्षा अधिक भूखंडावर उभ्या असलेल्या सोसायटय़ा, तसेच दररोज १०० किलोपेक्षा अधिक कचरा निर्माण होत असलेल्या सोसायटय़ा, हॉटेल्स अथवा मॉल आदींना कचऱ्यापासून खतनिर्मिती करणारे प्रकल्प उभारणे बंधनकारक करण्यात आले. यामुळे काही प्रमाणात कचरा कमी झाल्याचा दावा पालिका अधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे. मुंबईतील झोपडपट्टी परिसर, चाळी, गावठाणे, छोटय़ा इमारतींमध्ये जनजागृती करूना कचऱ्यापासून खतनिर्मिती प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत.

* म्हणून राजधान्यांमध्ये मुंबईला आघाडी

* मुंबईमध्ये २०१५ मध्ये प्रतिदिन नऊ हजार ५०० मेट्रिक टन कचरा निर्माण होत होता. पालिकेने केलेल्या उपाययोजना व नागरिकांकडून मिळालेले सहकार्य यामुळे कचऱ्याचे प्रमाण आता प्रतिदिन सात हजार १०० मेट्रिक टनांपर्यंत खाली आले आहे.

* पालिकेने कचरा वर्गीकरण, कचऱ्यापासून खतनिर्मिती, जनजागृती, प्रदर्शने आदीमुळे मुंबईला यश मिळाले आहे. तसेच स्वच्छतेविषयी जनमताचा मोठय़ा प्रमाणावर कौल मिळावा यासाठीही पालिकेने विशेष प्रयत्न करण्यात आले होते, असे मत पालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

मुंबईत एक हजार ६९० सामुदायिक शौचालये ८९८ पैसे द्या आणि वापरा तत्त्वावरील शौचालये आणि एक हजार ९४१ वैयक्तिक शौचालये बांधण्यात आली आहेत. हागणदारी आढळून आलेल्या ठिकाणी फिरती शौचालये उपलब्ध करून देण्यात आली असून वर्षभरात ९४० शौचकूप असलेली फिरती शौचालये उपलब्ध करून देण्यात आली आहेत.