लोहमार्ग पोलिसांच्या हेल्पलाइनवर तक्रारींचा भडिमार

मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरील लोकल गाडय़ांमध्ये अपंग व महिलांसाठी आरक्षित डब्यात मोठय़ा प्रमाणात घुसखोरी होत असून त्याविरोधात लोहमार्ग पोलिसांच्या १५१२ हेल्पलाइनवर तक्रारींचा भडिमारच केला जात आहे. अपंग डब्यातील घुसखोरीच्या सप्टेंबर व ऑक्टोबर २०१९ मध्ये २७६ तक्रारी आल्या असून महिलांच्या डब्यात घुसखोरीच्या १०४ तक्रारी हेल्पलाइनवर प्राप्त झाल्या आहेत.

या तक्रारींव्यतिरिक्त लोकल प्रवासात प्रवाशांमध्ये भांडण, चोरी, बॅग विसरणे, दारू पिणारे प्रवासी, विनयभंग, प्रवासी बेपत्ता होणे इत्यादी कॉलही हेल्पलाइनवर करण्यात आले आहेत. लोकल गाडय़ांमध्ये महिला व अपंग प्रवाशांसाठी असलेल्या डब्यांमध्ये सामान्य प्रवाशांकडून घुसखोरी केली जाते. त्याविरोधात दंडात्मक कारवाईही केली जाते. परंतु घुसखोरी काही केल्या थांबलेली नाही. मध्य रेल्वेने तर काही लोकल गाडय़ांच्या अपंग डब्यात सुरक्षा दलाचे जवान तैनात केले असून ते प्रवेश करणाऱ्या सामान्य प्रवाशांना हुसकावून लावत आहेत. घुसखोरी काहीशी कमी झाल्याचा दावाही मध्य रेल्वे सुरक्षा दलाचे अधिकारी करतात.

या घुसखोरीविरोधात रेल्वे पोलिसांच्या हेल्पलाइनवरही तक्रारी केल्या जात आहेत. सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात लोहमार्ग पोलिसांच्या १५१२ या हेल्पलाइनवर या आरक्षित डब्यातील घुसखोरांवर कारवाईसाठी मदत मागण्यात आली आहे. अपंगांच्या डब्यातील घुसखोरीविरोधात सप्टेंबर महिन्यात १४९, तर महिला डब्यातील घुसखोरीविरोधात ५५ कॉल आल्याचे सांगण्यात आले. ऑक्टोबर महिन्यातही अपंग आणि महिला डब्यातील घुसखोरांविरोधात अनुक्रमे १२७ आणि ४९ कॉल आले. त्याची दखल लोहमार्ग पोलिसांकडून घेण्यात आली. सप्टेंबर महिन्यात महिला डब्यात घुसखोरी केल्याविरोधात एक गुन्हा, तर ऑक्टोबर महिन्यात अपंगांच्या डब्यात घुसखोरीबद्दल दोन गुन्हेही दाखल झाले आहेत.

१८२  तक्रारी भांडण, वादाच्या

लोकल प्रवासात दोन प्रवासी किंवा गटांमध्ये भांडण, वाद हे नित्यनियमाचे झाले आहेत. त्यामुळे गुन्हेही दाखल झाले आहेत. याविरोधातही प्रवाशांकडून हेल्पलाइनवर तक्रारी करण्यात आल्या आहेत. सप्टेंबर महिन्यात ९६ तक्रारी आल्यानंतर यात ४ गुन्हे दाखल झाले आहेत. तर ऑक्टोबर महिन्यात ८६ तक्रारी दाखल होतानाच एकही गुन्हा मात्र दाखल झालेला नाही.