मुंबई : दहावी, बारावीच्या शैक्षणिक टप्प्यानंतर पुढील वाट चोखाळण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे संकेतस्थळ राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने तयार केले असून साडेपाचशेहून अधिक अभ्यासक्रम आणि संधींबाबतची माहिती या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. करोनाकाळानंतर विविध क्षेत्रांवर होणाऱ्या परिणामांचा अदमासही या संकेतस्थळावर घेण्यात आला आहे.

कला, वाणिज्य, विज्ञान या शाखांपलीकडेही अनेक क्षेत्रांत कुशल मनुष्यबळाची आवश्यकता असते. विविध क्षेत्र, त्यासाठीची मागणी, आवश्यक पात्रता, शिक्षणाचे पर्याय याची माहिती शालेय शिक्षण विभागाच्या नव्या संकेतस्थळावर एकगठ्ठा मिळू शकते. जवळपास ५५० हून अधिक अभ्यासक्रमांची आणि २१ हजारांहून अधिक संस्थांची माहिती या संकेतस्थळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळू शकेल. अभ्यासक्रमाचे स्वरूप, त्यासाठीची पात्रता, प्रवेश परीक्षा, विविध संस्था, शुल्क, अभ्यासक्रमासाठी असलेल्या शिष्यवृत्ती यांची माहिती या संकेतस्थळावर आहे. भारतातील संस्थांबरोबरच जवळपास १४ देशांतील शिक्षण संधींचीही माहिती मिळू शकेल. त्याचबरोबर अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर मिळणाऱ्या संधी, अपेक्षित वेतन, बाजारपेठेचा प्रभाव हे घटकही जाणून घेता येतील. प्रत्येक क्षेत्रातील नामवंतांची माहिती देण्यात आली आहे. करोनानंतर प्रत्येक क्षेत्रात अपेक्षित असणारे बदल, नव्या संधी यांचाही अंदाज या संकेतस्थळाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आला आहे. युनिसेफच्या सहकार्याने या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना २७ मेपासून त्यांचा सरल क्रमांक वापरून संकेतस्थळाचा लाभ घेता येईल. http://www.mahacareerportal.com या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना करिअर संधींची माहिती मिळू शकेल.