मराठी शाळांविषयीचा गैरसमज दूर करण्यासाठी उपक्रम

मराठी शाळेत शिकल्यानंतर पाल्य इतरांच्या तुलनेत मागे पडेल, ही पालकांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी शहरातील २५ उपक्रमशील मराठी शाळा निवडून त्यांची माहिती मराठी पालकांपर्यंत पोहोचविण्याची योजना मराठी शाळा संवर्धन समितीने हाती घेतली आहे.

मराठी शाळांचा दर्जा, शिक्षणाची गुणवत्ता, इंग्रजी शाळांविषयीचे गैरसमज यामुळे मराठी शाळा बंद पडत आहेत. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत आहे. त्यामुळे त्यांना ना धड मराठी बोलता येत, ना इंग्रजी. त्यामुळे बंद पडत असलेल्या मराठी शाळा वाचविण्यासाठी आजी-माजी शिक्षक, माजी विद्यार्थी आणि मराठी भाषकप्रेमींनी मराठी शाळा वाचविण्यासाठी मराठी शाळा संवर्धनाची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेची भविष्यातील वाटचाल ठरविण्यासाठी पहिली बैठक नुकतीच गोरेगावच्या अ. भि. गोरेगावकर शाळेत पार पडली. त्या वेळी उपस्थितांनी मते मांडली व मराठी शाळा वाचवण्यासाठी काय करणे गरजेचे आहे याबाबत सूचना केल्या.

मराठीतून शिक्षण घेतलेल्या यशस्वी पालक आणि मुलांची सभा घेऊन त्यातून मुलाखतीद्वारे मराठीतून शिक्षण घेण्याचे फायदे पालकांपर्यंत पोहोचविण्याचे या बैठकीत ठरले. मराठी शाळांवर एकही पैसा खर्च करायचा नाही, हा शासनाचा छुपा धोरणात्मक निर्णय हाणून पाडण्यासाठी व मराठी शाळा वाचाव्यात यासाठी शासनापर्यंत आवाज पोहोचविण्यासाठी सर्व मराठीसाठी काम करणाऱ्या संघटनांनी एकत्र येऊन बिगर राजकीय चळवळ उभी करणे आवश्यक असल्याचे मत या वेळी उपस्थितांनी मांडले.

शाळांचे खासगीकरण रोखणार

मुंबईतील ३५ महापालिका शाळांचे खासगीकरण रोखण्यासाठी मुंबईच्या महापौरांना निवेदन देण्यात येणार आहे. तसे न झाल्यास महापौर बंगल्याबाहेर आंदोलन पुकारले जाईल, असा इशारा मराठी अभ्यास केंद्राच्या वतीने आनंद भंडारे यांनी दिला. केंद्राच्या वतीने मराठी शाळेत शिकणाऱ्या मुला-मुलींचे, पालकांचे एकत्रित संमेलन २२ जुलै रोजी डी. एस. शाळा, शीव आणि २९ जुलै रोजी अ. भि. गोरेगावकर शाळा गोरेगाव येथे होणार आहे. त्यात सर्व मराठी भाषकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन भंडारे यांनी केले.