अभियांत्रिकी पदवी असो किंवा व्यवस्थापनाची पदवी विद्यार्थ्यांना नोकरी करण्यापूर्वी विशेष प्रशिक्षण देण्याची गरज भासते. यासाठी आजही अनेक बडय़ा कंपन्या लाखो रुपये खर्च करत असतात. खरे तर आपली शिक्षण पद्धतीच अशी असायला हवी की पदवी मिळताच विद्यार्थी थेट कंपन्यांत आवश्यक ते काम करू शकेल. पण दुर्दैवाने सध्या तरी तशी व्यवस्था आपल्याकडे नाही. याची खंत अनेक शिक्षणतज्ज्ञांबरोबरच व्यवसायांनीही नोंदविली आहे. यातूनच शिक्षण संस्था आणि कंपन्या यांच्यामधील दुवा होण्यासाठी अनेक खासगी कंपन्या पुढे येऊ लागल्या आहेत. यातीलच एक म्हणजे ‘टिंकरमास्टर’. राजीव कोयल आणि गुरुप्रसाद अथानी यांनी चार वर्षांपूर्वी सुरू केलेल्या या कंपनीच्या माध्यमातून सध्या हे काम प्रभावीपणे सुरू आहे.

अशी झाली सुरुवात

आपल्या देशात शाळांमध्ये पुस्तकी ज्ञानाला महत्त्व दिले जाते. विज्ञानाचे प्रात्यक्षिक होते तेही पुस्तकातील दाखल्यांनुसारच. यामुळे पदवी पूर्ण झाल्यावर जेव्हा नोकरी करण्याची वेळ येते तेव्हा अनेक उमेदवार कमी पडतात. यामुळे कंपन्यांना पाहिजे तसे काम होत नाही. मग यासाठी कंपन्यांनी त्यांच्या स्तरावर प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. मात्र तसे प्रशिक्षण देणे कोणत्याही कंपनीला आर्थिकदृष्टय़ा परवडणारे नसल्याने कंपन्यांकडून तशा तक्रारी येऊ लागल्या. बडय़ा कंपन्या प्रशिक्षणात गुंतवणूक करत असल्या तरी छोटय़ा कंपन्यांना मात्र ते शक्य होत नाही. या सर्व पाश्र्वभूमीवर शैक्षणिक संस्था आणि कंपन्या यातील दुवा होण्यासाठी अनेक कंपन्या पुढे येऊ लागल्या. राजीव कोयल आणि गुरुप्रसाद अथानी या दोन अनुभवी मंडळींनी एकत्र येऊन विद्यार्थ्यांना छंद जोपण्यासाठी रोबोटिक्स, एरोमॉडेलिंग, इलेक्ट्रॉनिक्स आणि फन सायन्स यामध्ये काही प्रयोग आणले. यासाठी त्यांनी त्याला ‘हॉबी मास्टर’ असे नाव दिले होते. त्यांच्या या प्रयोगाला विद्यार्थी आणि पालकांकडून चांगला प्रतिसाद मिळू लागला. यानंतर त्यांनी हीच संकल्पना शाळांमध्ये सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या विज्ञानाच्या पुस्तकातील प्रयोगांचा समावेश यामध्ये करण्यात आला. यातून ‘टिंकरमास्टर’चा जन्म झाला.

भविष्यातील वाटचाल

कंपनीतर्फे सध्या ५० शाळांमध्ये ही प्रयोगशाळा स्थापन करण्यात आली असून चार विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होत आहे. भविष्यात देशभरातील शाळांमध्ये या प्रयोगशाळा उभारून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा मानस असल्याचे कोयल यांनी नमूद केले. याचबरोबर ज्या शाळांमध्ये ही प्रयोगशाळा नसेल अशा विद्यार्थ्यांनाही कंपनीच्या सुविधांचा लाभ घेता यावा यासाठी संकेतस्थळ विकसित करण्यात येणार असून यामध्ये व्हिडीओ व्याख्यानांच्या मदतीने प्रशिक्षण देण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.

नवउद्यमींना सल्ला

उद्योगाची स्थापन करत असताना आपण समाजाला काही तरी देणे लागतो ही भावना डोळ्यासमोर ठेवणे गरजेचे आहे. यामुळे समाजाला काय गरज आहे हे ओळखून व्यवसायाची निवड करावी असे कोयल यांनी नमूद केले.

याचबरोबर आपली संकल्पना ही पूर्णपणे नवीन असायला हवी कोणाची तरी नक्कल त्यात नसावी. तसे झाल्यास अनेकदा फसगत होण्याची शक्यता असल्याचेही ते म्हणाले. जर तुमची संकल्पना लोकांना भावणारी असेल तर तुम्ही नक्कीच यशस्वी होऊ शकता असेही कोयल म्हणाले.

असे चालते काम

टिंकरमास्टरच्या माध्यमातून शाळांमध्ये एक आगळी प्रयोगशाळा उभी केली जाते. या प्रयोगशाळेत संकल्पना, कौशल्य आणि प्रात्यक्षिक या शैक्षणिक सुवर्ण त्रिकोणाचा विचार करून विद्यार्थ्यांना विविध प्रयोग करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते. अनेक कंपन्या शाळांमध्ये अशा प्रयोगशाळा उभारून देतात, मात्र त्या चालवण्याची क्षमता त्यांच्याकडे नसते किंवा त्याची जबाबदारी अनेकदा शाळेतील शिक्षकांवरच टाकली जाते. मात्र टिंकरमास्टर असे न करता या प्रयोगशाळेत कंपनीतर्फे उच्चशिक्षित प्रशिक्षक नेमला जातो. जो विद्यार्थ्यांकडून विविध प्रयोग करून घेतो. यासाठी विशेष अभ्यासक्रमाची निर्मिती केली असून तो २४ सत्रांमध्ये पूर्ण केला जातो, अशी माहिती कोयल यांनी दिली. या प्रयोगशाळेत अभियांत्रिकी, उपयुक्त विज्ञान याला विशेष महत्त्व देण्यात आले आहे.

गुंतवणूक आणि उत्पन्नस्रोत

कंपनीची प्राथमिक गुंतवणूक ही स्थानिक पातळीवर उभारण्यात आली होती. याचबरोबर कंपनीचे मुख्य उत्पन्नस्रोत हे त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीतूनच होते. विविध प्रयोगांसाठीच्या विविध किट्स कंपनीतर्फे विकसित करण्यात आल्या आहेत. याचबरोबर कंपनीची प्रयोगशाळा शाळांना विकत घ्यावी लागते. त्यासाठी काही रक्कम शाळांकडून कंपनी घेते. यातून कंपनीला उत्पन्न होते.

नीरज पंडित

@nirajcpandit