मुंबई आणि पुणे या दोन्ही शहरांना जोडणारी सर्वात वेगवान गाडी, अशी ओळख असलेल्या इंटरसिटी एक्स्प्रेसला सोमवारी १२ वर्षे पूर्ण झाली. गाडीच्या या १२व्या वाढदिवसाबद्दल या गाडीतून दर सोमवारी नेमाने मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांनी हा वाढदिवस जोमात साजरा केला. १५ मार्च २००४ रोजी पहिल्यांदा धावलेल्या गाडीने अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली असून मुंबई-पुणे मार्गावर सर्वात कमी म्हणजे १४ डबे असलेली ही एकमेव गाडी आहे.
काही वर्षांपूर्वी मुंबई-पुणे यांदरम्यान गारेगार प्रवासाची हमी देण्यासाठी रेल्वेने शताब्दी एक्स्प्रेस सुरू केली होती. मात्र या गाडीला प्रवाशांचा अल्प प्रतिसाद लाभल्याने ही गाडी बंद करण्यात आली. या गाडीची जागा घेणारी गाडी म्हणून १२ वर्षांपूर्वी १५ मार्च रोजी इंटरसिटी गाडी पहिल्यांदा धावली.
मुंबई-पुणे या दोन्ही शहरांमधील प्रवाशांचे आणि रेल्वेचे जिव्हाळ्याचे नाते सर्वश्रुत आहेच. डेक्कन क्वीनसारख्या महत्त्वाच्या गाडीशी गेली आठ दशके भावनिक नाते जोपासणाऱ्या प्रवाशांना या गाडीचे कौतुकही असते. मुंबई-पुणे यांदरम्यान धावणाऱ्या इंद्रायणी, डेक्कन एक्स्प्रेस, प्रगती एक्स्प्रेस, सिंहगड या गाडय़ांबरोबरही प्रवाशांचे असेच भावनिक नाते आहे. इंटरसिटी ही गाडी मुंबईकर वा पुणेकर प्रवाशांसाठी त्या मानाने नवीनच असली, तरी कामानिमित्त वा शिक्षणानिमित्त पुण्याला राहणाऱ्या मुंबईकरांसाठी गेली १२ वर्षे या गाडीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. या गाडीच्या अशा नियमित प्रवाशांनी एकत्र येत सोमवारी आपल्या लाडक्या गाडीचा १२ वा वाढदिवस उत्साहात साजरा केला. सुटीचे दोन दिवस कुटुंबाबरोबर राहिल्यानंतर सोमवारी सकाळी कामाच्या वेळेत पुण्यात पोहोचणारी गाडी आमच्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनली आहे, अशी प्रतिक्रिया गेली आठ वर्षे या गाडीने नियमित प्रवास करणाऱ्या शंतनू भिडे यांनी दिली.
या मार्गावरील डेक्कन क्वीन ही सर्वाधिक मानाची गाडी मानली जाते. मात्र ही गाडी केवळ कर्जत, लोणावळा आणि शिवाजीनगर असे तीनच थांबे घेत हे अंतर ३.१५ तासांत कापते. तर, सकाळी ६.४० वाजता मुंबईहून सुटणारी इंटरसिटी एक्स्प्रेस हेच अंतर दादर, ठाणे, लोणावळा आणि शिवाजीनगर असे चार थांबे घेऊन ३.१७ तासांत कापते. त्यामुळे इंटरसिटी गाडी ही या दोन स्थानकांमधील वेगवान गाडी मानली जाते.