News Flash

‘कस्तुरबा’त उभारणार आंतरराष्ट्रीय दर्जाची साथरोग आजार व प्रतिकारशक्ती शास्त्र संशोधन संस्था!

भविष्यातील साथरोगाचाही घेणार वेध, १२ कोटी ७४ लाख खर्च

संदीप आचार्य 
मुंबई: करोनाच्या साथीने संपूर्ण जगाला हादरवून सोडले आहे. भारताला त्यातही महाराष्ट्राला याचा सर्वाधिक फटका पडला असून सर्वाधिक रुग्ण व मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. या पार्श्वभूमीवर करोनासह विविध साथरोग आजार, रुग्णामधील प्रतिकाशक्ती, जनुकीय बदल, प्रतिपिंडासह उपचाराची दिशा आदींसदर्भात संशोधन करण्यासाठी महापालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात आंतरराष्ट्रीय दर्जाची ‘साथरोग आजार व प्रतिकारशक्ती शास्त्र संस्था’ स्थापन करण्यात येणार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रस्तावित संशोधन संस्थेला तत्वत: मान्यता दिली आहे. पहिल्या टप्प्यात यासाठी १२ कोटी ७४ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी मुलुंड येथे पाच हजार बेड क्षमता असलेल्या साथरोग व सुपर स्पेशालिटी रुग्णालयाची घोषणा केली आहे तसेच राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी साथरोग रुग्णालय उभारण्याची भूमिका घेतली आहे. याचबरोबर भारतीय लोकांची प्रतिकारशक्ती व क्षमता, भारतातील आजार, जलजन्य आजार, प्लाझ्मा उपचार, अँण्टिबॉडी,टी सेल प्रतिकारशक्ती, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय साथरोग, करोना तसेच आगामी काळातील आजारांचा सामना करण्यासाठी करावयाची तयारी आदीचा अभ्यास व संशोधन करण्यासाठी ‘आयसीएमआर’चे सहसंचालक डॉ. ओम श्रीवास्तव यांनी राज्य शासनाला रुग्णालयाशी संलग्न असलेली आंतराराष्ट्रीय दर्जाची संशोधन संस्था स्थापन करण्याबाबतचा प्रस्ताव सादर केला आहे. गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे झालेल्या प्रमुख अधिकारी, तज्ज्ञ डॉक्टर्स यांच्या बैठकीत आयसीएमआर’चे सहसंचााल कडॉ. ओम श्रीवास्तव यांनी या नियोजित संशोधन संस्थेची माहिती सादर केली होती. मुख्यमंत्री ठाकरे यांनी या प्रस्तावाला तत्वतः मान्यता दिल्यानंतर डॉ. श्रीवास्तव यांनी सोमवारी हा प्रस्ताव राज्य सरकारला सादर केला आहे. राज्यात पुणे येथे अशाप्रकारची ‘एनआयव्ही’ ही संस्था असली तरी रुग्णालयाशी संलग्नता ठेवून व्यापक संशोधन व उपचारांची दिशा निश्चित करणारी नवी आंतरराष्ट्रीय दर्जाची संस्था लवकरच स्थापन होणार असल्याचे पालिकेतील एका ज्येष्ठ अधिकार्यांनी सांगितले. कस्तुरबा रुग्णालयातील या संशोधन संस्थेत अँण्टिबॉडी म्हणजे

प्रतिपिंडाचा अभ्यास, टी सेल ज्यात शरीरातील विषाणू निष्क्रिय करण्याची क्षमता असलेली प्रतिपिंड, थुंकी, घसा तसेच लाळेतून घेतलेला द्रव, करोना व अन्य साथरोग आजारांवरील औषधे, विषाणू संसर्गावरील उपाययोजना, प्रतिकाशास्त्र, संसर्गजन्य आजार तसेच साथरोग आजारांवर व्यापक संशोधन केले जाणार आहे. यातून रुग्णामधील प्रतिकारशक्ती कशी विकसित करता येईल यावर प्रामुख्याने अभ्यास केला जाणार आहे. त्याचबरोबर अशा गोष्टींचा सामना करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील त्रुटी शोधून त्या दूर करण्यावर भर दिला जाणार आहे. वैद्यक क्षेत्रातील महत्वाच्या संशोधनावरही ही संस्था लक्ष ठेवून राहाणार आहे.

यातील महत्वाचा भाग म्हणजे करोना झालेले काही रुग्ण हे गंभीर व तीव्र स्वरुपाची लक्षणे दाखवतात तर काहींना सौम्य स्वरुपात तो का होतो यावरील संशोधनातून कोवीड उपचार व प्रतिबंध तसेच लस निर्मितीची दिशा स्पष्ट होईल.

हे संशोधन एका व्यापक पायावर उभे राहाणार असून यात सार्वजनिक आरोग्य, रुग्णालये, विद्यापीठे, आरोग्य विज्ञान विद्यापीठ, पशुवैद्यकीय विद्यापीठ, वैद्यकीय संशोधन संस्था, एपिडेमॉलॉजी म्हणजे प्रतिबंधात्मक शास्त्रासह वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञांना सामावून घेण्याचे डॉ. श्रीवास्तव यांच्या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. ‘इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन इन्फेक्शस डिसीज, इम्युनॉलॉजी अॅण्ड आउटब्रेक मॅनेजमेंट’ असे या प्रस्तावित संस्थेचे नाव असून याच्या गर्व्हर्निंग बॉडी चे प्रमुख डॉ. ओम श्रीवास्तव असतील. याशिवाय डॉ. जयंती शास्त्री, डॉ. स्वप्नील पारीख, अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, टाटा ट्रस्ट व राज्य सरकारचे प्रतिनिधी यांचा समावेश असणार आहे.
पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात यासाठी २००० चौरस फुटांची जागा पहिल्या

टप्प्यासाठी निश्चित करण्यात आली असून बांधकामासाठी ७५ लाख, दोन प्रयोगशाळांसाठी सहा कोटी, आवश्यक उपकरणे २५ लाख, आपत्कालीन खर्च एक कोटी तसेच संशोधक व अन्य कर्मचारी यांच्यासाठी चार कोटी ७४ लाख ६० हजार असा १२ कोटी ७४ लाख ६० हजार रुपयांचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. तीन वर्षांत ही संशोधन संस्था पूर्णत्वास आलेली असेल यात दुसर्या टप्प्यातील नऊ कोटी रुपयांचा समावेश आहे. विषाणू, जीवाणूसह साथरोगाचा सामना करण्यासाठी ही संशोधन संस्था मोलाची ठरेल तसेच भविष्यातील रुग्णांना याचा नक्की फायदा होईल, असा विश्वास या प्रस्तावात व्यक्त करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 4, 2020 4:15 pm

Web Title: international institute of infectious diseases and immunology research institute to be set up in kasturba hospital scj 81
Next Stories
1 मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट; अतिवृष्टीची शक्यता
2 सुशांत सिंह राजपूत प्रकरणालाही मुंबईच्या पावसाचा फटका
3 अतिवृष्टीमुळे मुंबई आणि उपनगरांतील शासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर, अत्यावश्यक सेवा सुरुच
Just Now!
X