केंद्राच्या आकडेवारीवरून राज्य सरकारचा खोटेपणा उघड ; काँग्रेसचा दावा

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात गुंतवणुकीमध्ये राज्य आघाडीवर होते. देशातील एकूण थेट परकीय गुंतवणुकीपैकी एकतृतियांश गुंतवणूक महाराष्ट्रात येत असे. परंतु भाजप-शिवसेना युती सरकारच्या काळात महाराष्ट्रातील गुंतवणुकीचे प्रमाण वेगाने घसरले असून, यंदा सप्टेंबपर्यंत राज्य तिसऱ्या क्रमांकावर घसरल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.

गुंतवणुकीबाबत महाराष्ट्र पिछाडीवर जात असल्याचे केंद्र सरकारच्याच आकडेवारीतून स्पष्ट होत असताना राज्य सरकार मात्र लोकांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी शनिवारी केला.

केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या ‘डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रिअल पॉलिसी अ‍ॅण्ड प्रमोशन’ने जाहीर केलेली आकडेवारी महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्राची अधोगती सांगण्यास पुरेशी आहे. या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात गुजरातच्या तुलनेत जेमतेम एकतृतियांश गुंतवणुकीचे प्रस्ताव आले आहेत. पूर्वी गुजरात महाराष्ट्रापेक्षा किती तरी पिछाडीवर असायचा. परंतु, विद्यमान सरकारच्या नाकर्तेपणाचा हा परिणाम असल्याचा आरोपही सावंत यांनी केला.

मुख्यमंत्र्यांनी गुजरातप्रमाणे फार गाजावाजा करून मेक इन महाराष्ट्रच्या माध्यमातून आठ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाल्याचा दावा केला होता. राज्य सरकारला तीन वर्षे झाल्यानंतर राज्यात १ लाख २९ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाल्याचे सराकारने जाहीर केले. उद्योगमंत्र्यांनी तर देशातील ५० टक्क्यांपेक्षा अधिक गुंतवणूक राज्यात आल्याचा दावा केला आहे. मात्र केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य मंत्रालयाने जाहीर केलेली आकडेवारी या सरकारचा खोटेपणा उघड पाडणारी असून या तीन वर्षांत महाराष्ट्र पिछाडीवर गेला आहे, भाजप सरकारच्या नाकर्तेपणामुळे महाराष्ट्र आता गुंतवणुकीकरिता आकर्षक केंद्र राहिले नाही, असे दुर्दैवाने म्हणावे लागेल असे सावंत म्हणाले.

‘राज्याची तिसऱ्या क्रमांकावर घसरण’

केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या ‘डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रिअल पॉलिसी अ‍ॅण्ड प्रमोशन’ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, २०१६ मध्ये कर्नाटकमध्ये १ लाख ५४ हजार १३१ कोटी, गुजरातेत ५३ हजार ६२१ कोटी तर महाराष्ट्रात ३८ हजार ०८४ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे प्रस्ताव आले. सन २०१७च्या जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीमध्ये कर्नाटकात १ लाख ४७ हजार ६२५ कोटी रुपये, गुजरातमध्ये ६५ हजार ७४१ कोटी तर महाराष्ट्रात २५ हजार १८ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे प्रस्ताव आले. देशातील गुंतवणुकीच्या तुलनेत २०१५ मध्ये महाराष्ट्रात १०.७ टक्के, २०१६ मध्ये ९.२८ टक्के तर २०१७ च्या सप्टेंबर महिन्यापर्यंत केवळ ७.५३ टक्के इतकी गुंतवणूक आली आहे. यामुळे यंदा सप्टेंबपर्यंत राज्य तिसऱ्या क्रमांकावर घसरल्याचा दावा कॉँग्रेसने केला आहे.