नवी मुंबईचे पोलीस आयुक्त के. एल. प्रसाद यांचा स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज मंजूर करण्यास मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे.
   वैयक्तिक कारणास्तव आपण राजीनामा देत असल्याचे प्रसाद यांनी राजीनाम्यात नमूद केल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी स्वत: दूरध्वनी करून त्यांना सेवेत राहण्याची विनंती केली. परंतु त्यांनी आपली सरकारविरुद्ध नाराजी नाही. वैयक्तिक कारणामुळे राजीनामा देत असल्याचे स्पष्ट केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा मंजूर केला.
नियुक्तीत डावलले गेल्यामुळेच प्रसाद यांनी राजीनामा दिल्याची चर्चा होती. १९८२ च्या तुकडीतील आयपीएस अधिकारी असलेल्या प्रसाद यांना मागील सरकारने नवी मुंबईचे पोलीस आयुक्त केले होते. विद्यमान सरकारने आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या तेव्हा पुणे वा ठाण्याचे आयुक्तपद मिळेल, असे प्रसाद यांना वाटत होते. परंतु तसे न झाल्याने ते नाराज झाल्याची आवई उठविण्यात आली. मात्र या बदल्यांच्या वेळी त्यांनी राजीनामा दिला नाही. आता अलीकडे ते रजेवर होते आणि या काळात त्यांनी स्वेच्छानिवृत्तीच्या अर्जासोबत आपला राजीनामा गृहखात्याकडे पाठवून दिला. मात्र प्रसाद यांनी तसे कारण राजीनामा पत्रात दिलेले नाही. याबाबत प्रसाद यांचा संपर्क होऊ शकला नाही.